
अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी तेरावा स्मृतिदिन असून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिकांची पावले शिवतीर्थावरील शक्तिस्थळाकडे वळणार आहेत. यानिमित्ताने श्रद्धा आणि निष्ठेची वारीच शिवतीर्थावर अनुभवता येणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी शक्तिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अखंड ओघ राहणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून शक्तिस्थळावर दर्शन घेता येणार आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.
- शिवतीर्थ येथे पिण्याचे पाणी आणि अन्य सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिका, मुंबई पोलीस दल आणि शिवसेनेच्या माध्यमातून योग्य नियोजन केले आहे.
- शिवतीर्थ येथे शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होणार असल्याने या संपूर्ण परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज अधिकाऱयांनी सुरक्षेचा आढावा घेतला.
चाफ्याचा दरवळ
शक्तिस्थळावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या सोनचाफ्याचा वापर करण्यात आला असून या फुलांचा मनमोहक दरवळ शक्तिस्थळावर पसरला आहे. शक्तिस्थळाकडे जाणाऱया वाटेवर ठिकठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले असून शिवतीर्थ परिसर भगवामय झाला आहे.































































