सांग सांग भोलानाथ… विस्तार होईल काय? बुगुबुगुबुगु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून वेगाने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्य मंत्रिमंडळाचा कोणत्याही क्षणी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. यामुळे मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून बसलेल्या मिंधे गटाच्या आमदारांवर ‘सांग साग भोलाना विस्तार होईल काय?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

अजित पवार गटाचा महत्त्वाच्या पदांसाठी आग्रह, मिंधे गटाने त्याला विरोध करतानाच मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आणलेला दबाव, इच्छुकांची जोरदार लॉबिंग आणि राज्यात तसेच दिल्लीत सुरू असलेले बैठकांचे सत्र यामुळे विस्ताराबरोबरच खातेवाटपही लवकर होईल असा अंदाज होता. पण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण्याची शक्यता कमीच आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीर गटाला खात्यांचे वाटप करताना रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार उरकून घेण्यासाठी मिंधे गटाने उचल खाल्ली होती. मात्र भाजप हायकमांडकडून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पेंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत राज्यातील विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. अजित पवार गटाचे मंत्री शपथविधीनंतर आपापल्या मतदारसंघांच्या दौऱयावर आहेत. खुद्द मुख्यमंत्री शिंदे हेसुद्धा आजपासून राज्याच्या दौऱयावर निघाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्यांचा हिरमोड होणार आहे.

कोणाचे काढून कोणाला द्यायचे यावर विचार सुरू – प्रफुल्ल पटेल

शिंदे-भाजपमध्ये आधीच खात्यांचे वाटप झाले होत. आम्ही आता सत्तेत सामील झाल्याने कोणाकडून कोणते खाते काढून घ्यायचे आणि आम्हाला द्यायचे, त्याचबरोबर त्या मंत्र्याचे खाते काढून घेतल्यावर त्याला दुसरे कोणते खाते द्यायचे यावर विचार सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून या विषयावर सखोल चर्चा सुरू असून लवकरच खातेवाटप होईल, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.