कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरतेच्या स्वारीबाबत आपले मत स्पष्टपणे मांडले. काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर स्वारी केली नाही. तसेच सुरतेची लूट केली नाही, असा दावा करत आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाकडून चुकीचा इतिहास पसरवण्यात येत आहे, असा आरोपही ते करत आहे. मात्र, इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी आणि यातील तज्ज्ञांनी याबाबत मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. इतिहासकार छत्रपती शिवरायांनी सूरतेवर स्वारी केली होती, असे मत स्पष्टपणे मांडत आहेत.
छत्रपती शिवरायांनी एकदा नव्हे, दोनदा सुरतेवर स्वारी केली होती. मात्र, त्या स्वारीचा उद्देश वेगळा होता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत,जयसिंगराव पवार यांच्यासह अनेकांनी या स्वारीबाबत मत व्यक्त केलं आहे. कोणीही जनतेसमोर चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू नये, तरुणी पिढीपर्यंत चुकीची माहिती पसरवू नये, असेही शरद पवार म्हणाले.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला. हा पुतळा जोरदार वाऱ्यांमुळे कोसळला, असे सांगण्यात येते. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सुमद्रकिनारी अनेक वर्षे उभे आहेत. त्याठिकाणीही वाऱ्यांचा वेग असाच असतो. मात्र, या पुतळ्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्यानेच तो पडला, तसेच पुतळा उभारण्यापूर्वी जो अभ्यास करण्याची गरज होती, तो करण्यात आला नाही, असे दिसून येते, असेही शरद पवार म्हणाले. तसेच ज्यांना काम दिले, ते अनुभवी नव्हते, त्यांना एवढ्या मोठ्या कामाचा अनुभव नव्हता, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.
राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येते. राज्यात महिला अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना संतपाजनक आहेत, असेही ते म्हणाले. बदलापूर घटनेबाबत बाहेरून आलेल्या माणसांनी ठरवून आंदोलन केले, असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, जनतेने आपला रोष व्यक्त करणे, हा लोकशाहीतील जनतेचा अधिकार आहे. ज्यांनी आपला निषेध व्यक्त केला, त्यांच्यावर खटले भरले, हे अयोग्य आहे. तेथील स्थानिक जनतेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. यात कोणतेही राजकारण नाही. बदलापूरची घटना आणि राजकोट किल्ल्यावरील घटनेविरोधात जनतेने प्रतिक्रिया दिली, त्यात अयोग्य काहीही नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाबाबत आताच विचार करण्याची गरज आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एका विचाराने जनतेसमोर जाणार आहोत. निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, त्यामुळे त्यावर आताच निर्णय घेण्याची गरज नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. स्थिर सरकार देणे, हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.