
राज्यात लोकशाही संपून गुंडशाही सुरू झाल्याची भावना जनमानसात आहे. राज्यातील या परिस्थितीवरून आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गुंड भेटतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुंड भेटतात. मग लोकसभेला गुंडाचा वापर करणार आहात का? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी विचारला.
मला वाईट याचे वाटते की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच गुंडांना भेटत असावेत. आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केले आहे. ही तुमची वृत्ती आहे. भाजपाच्या जवळ गेल्यानंतर दादांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही गुंडांचा वापर करणार? असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला.
एसआयटीचा मुद्दा कोणी मांडला? भाजपाच्या आमदाराने मांडला. एसआयटी कोणी गठीत केली? तर एसआयटी भाजपाच्या अध्यक्षांनी गठीत केली. अशा परिस्थितीत कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय? त्यामुळे भाजपाचे टार्गेट एकनाथ शिंदे नाही ना, असा प्रश्न करत रोहित पवार यांनी टोला लगावला.



























































