
मुंबईत शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतरची कोरोना स्थिती पाहूनच घेण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज स्पष्ट केले. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात आला असला तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नसल्याने सद्यस्थितीत तातडीने शाळा सुरू करण्यात येणार नसल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या असल्या तरी आरोग्य तज्ञांनी तिसऱया लाटेचा इशारा दिल्यामुळे सद्यस्थितीत प्रशासनाची यंत्रणा अलर्ट आहे. 15 ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे आणि लोकलमध्येही गर्दी वाढल्याने सुमारे दुपटीने दैनंदिन रुग्णवाढ झाली आहे. त्यामुळे शाळा दिवाळीनंतर तरी सुरू होणार का असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना महापौरांनी पालिकेची भूमिका स्पष्ट केली. दिवाळीनंतर कोरोनाची स्थिती पाहूनच प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
धोका पत्करणे महागात पडेल
/
कोरोना लसीकरण वेगाने सुरू असले तरी लहान मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे मुलांचे लसीकरण न करता शाळा सुरू करणे महागात पडेल, असे महापौर म्हणाल्या. 80 टक्के पालकवर्गही असा धोका पत्करण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दिवाळीनंतरची स्थिती पाहूनच शाळांबाबतचा निर्णय घेणे योग्य ठरेल असेही महापौरांनी स्पष्ट केले.
पुनर्विकास प्रकल्पांसाठी नगरसेवकांची मंजुरी लागणार
पालिकेच्या भूखंडावरील वसाहती, चाळींच्या पुनर्विकासासाठी आता सुधार समिती आणि महासभेची मंजुरी घेणे अनिवार्य राहणार आहे. या महत्त्वपूर्ण ठरावाला महासभेत मंजुरी मिळाल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी सांगितले. सर्वपक्षीयांनी या ठरावाला पाठिंबा दिल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे ते म्हणाले.






























































