
उगाच लोकांना काहीतरी दाखवण्यासाठी हा बजेट सादर करण्यात आला आहे. विधानभवनात रिकाम्या खुर्च्यांसमोर मागच्या 6 महिन्यांमध्ये अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एकाही घोषणेची अंमलबाजवणी झाली नाही. ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला अशा सरकारवर कोणाचाही विश्वास नाही. त्यामुळे संत आणि धर्माबद्दल बोलणं यांच्या तोंडी शोभत नाही. ज्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले, महाराष्ट्राची बदनामी केली, उद्योग पळवून लावले अशी लोकं थोर पुरुषांची नावं घेत आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये हे सरकार पडणार हे कदाचित उपमुख्यमंत्र्यांना माहित असेल म्हणून या घोषणा झाल्या आहेत. हे म्हणजे हसवा फसवी बजेट आहे. अशी घणाघाती टीका युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. विधानसभेचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाविकास आघाडीच्या काळात आम्ही पर्यटनस्थळांना पर्यटन विभागातून जो निधी दिला होता त्याला अद्यापही स्थगिती दिली आहे. सुशोभीकरणाचे पैसे महानगरपालिकेचे आहेत, स्मारकाचे पैसे आधीच्या सरकारने दिले आहेत. ज्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची आशा दिसत नाही अशा लोकांना कुठेना कुठेतरी बसवणं गरजेचं आहे. त्यामुळे हे बजेट गाजराचा हलवा बजेट आहे. ज्यात केवळ घोषणा करण्यात आल्या आहेत. अशा घोषणा मागील सहा महिन्यातही झाल्या मात्र त्यावर अंमलबजावणी मात्र झाली नाही. मुंबईसाठी बजेटमधून काहीच मिळालं नाही. यांचा मुंबईवर एवढा राग आणि द्वेष का आहे? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला.
या बजेटवर नक्की कोणाचा प्रभाव होता हे त्या 40 गद्दारांना विचारायला हवं. अजूनही कोणत्याही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. आरेचं जंगल कापणारी लोकं पर्यावरणाबद्दल बोलतात हे हास्यास्पद आहे. प्रति किलोमीटर रस्त्याला 15 कोटी खर्च हादेखील या सरकारचा घोटाळा आहे. अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.

























































