
राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये तब्बल दोन लाखांच्या आसपास कर्मचारी व अधिकाऱयांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यात गृह विभागात सर्वाधिक म्हणजे 28 हजार पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ सार्वजनिक आरोग्य विभागात सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे पुढे आले आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदांमध्ये प्रशासकीय सेवेवर कमालीचा ताण पडत आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्यातल्या जिल्हा परिषदा व विविध विभागांमधील रिक्त पदांची माहिती मागवली होती. त्यात 31 डिसेंबर 2019 अखेरपर्यंतच्या रिक्त पदांचा तपशील देण्यात आलेला आहे.
या माहितीनुसार राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग व जिल्हा परिषदांमध्ये सुमारे 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. वेगवेगळय़ा विभागांमध्ये 10 लाख 91 हजार 104 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरली आहेत. उर्वरित पदे रिक्त असल्याची माहिती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
गृह विभाग- 28 हजार
सार्वजनिक आरोग्य विभाग- 20 हजार 509
जल संपदा विभाग- 20 हजार 873
कृषी विभाग- सुमारे 14 हजार
महसूल व वन विभाग- 12 हजार
सार्वजनिक बांधकाम विभाग- 8 हजार 626
शालेय क्रीडा विभाग- 5 हजार

























































