
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतच करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आज मुंबईतील तीनही शिक्षण निरीक्षक कार्यालयांवर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत, संबंधित कार्यालयांना निवेदनही सादर केले.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये असंख्य जागा रिक्त असतानाही सुमारे 525 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे, पालघर, रायगड यांसारख्या दुर्गम भागांमध्ये करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या अतिरिक्त शिक्षकांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असून, त्यांच्यासाठी अशा ठिकाणी रोजचा प्रवास करणे अत्यंत अवघड आहे. या समायोजन प्रक्रियेमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, वयोमर्यादा, आजारपण, सिंगल पेरेंट्स यांसारख्या संवेदनशील बाबींची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असा शिक्षकांचा आरोप आहे.
या आंदोलनाचे पश्चिम विभागात शिक्षक आमदार जे.एम. अभ्यंकर, दक्षिण विभागात आर.बी. पाटील, तर उत्तर विभागात कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी नेतृत्व केले. त्यांच्यासोबत जगदीश भगत, अजित चव्हाण, पैलास गुंजाळ, संतोष शिंदे, हितेंद्र चौधरी, नरेंद्र शिंदे, केरबा सरक, शशिकांत उतेकर, सत्यप्रकाश राय, संतोष नरुटे यांच्यासह शेकडो अतिरिक्त शिक्षक उपस्थित होते. शासनाने त्वरित दखल घेऊन अतिरिक्त शिक्षकांचे मुंबईतच समायोजन करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा लवकरच राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक सेनेने दिला आहे.