
पतपेढी, सरकारी बँका, खासगी कंपन्यांमध्ये सेने तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेताना सोन्याचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी गोल्ड वॅल्युअरची गरज असते. मात्र, हे मूल्यमापन प्रशिक्षित व्यक्तीकडून केले जात नाही. त्यामुळे या ठिकाणी योग्य प्रशिक्षण घेतलेल्या गोल्ड वॅल्युअरचीच भरती करा, अशी मागणी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेने केली आहे.
हिंदुस्थान सरकारच्या सूक्ष्म आणि लघु उद्योग अंतर्गत येणाऱ्या इन्स्टिटय़ूट फोर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिक मेजरिंग इस्ट्रूमेंटस या संस्थेकडून सोने मूल्यमापन अभ्यासक्रम (गोल्ड वॅल्युएशन कोर्स) चालवला जातो. या अभ्यासक्रमाला हिंदुस्थान सरकारची मान्यता आहे. पतपेढी, सरकारी बँका, म्युथुट फायनान्ससारख्या खासगी कंपन्यांमध्ये सोने गहाण ठेवून त्यावर कर्ज दिले जाते. मात्र, सोन्याचे मूल्यमापन करताना त्यांच्याकडे प्रशिक्षित व्यक्ती नसते. अशा वेळी सोन्याचे योग्य मूल्यमापन होत नाही आणि कमी भावात कर्ज वितरण होते. त्यामुळे अशा ठिकाणी इन्स्टिटयूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिक मेजरिंग इस्ट्रूमेंटस संस्थेमधील प्रशिक्षित अशा गोल्ड वॅल्युएटरची भरती केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे अध्यक्ष प्रवीण जुवाटकर यांनी केली आहे.
इन्स्टिटय़ूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिक मेजरिंग इस्ट्रूमेंटस संस्थेतून 300 सुवर्णकारांनी नुकताच अभ्यासक्रम पूर्ण केला. यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱयांना खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी आमदार सुनील शिंदे, सुवर्णकार सेनेचे संतोष मुरकुटे, विराज वेदपाठक, अभिजीत देवरुखकर, नरेश वैद्य, सागर साने, संजय नागवेकर, संजय कारेकर, हेमंत कारेकर, सुनील खेडेकर, संदीप राजपूरकर आदी उपस्थित होते.

























































