गणेशोत्सवाआधी शिक्षकांना ऑगस्टचा पगार मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवापूर्वी राज्यातील शिक्षकांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा पगार जमा होणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार 31 ऑगस्टपूर्वी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक शिक्षक आपल्या मूळ गावी जातात.

या उत्सवाच्या तयारीसाठी शिक्षकांचा पगार 25 ऑगस्टदरम्यान करण्यात यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने 3 ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच शिक्षक आमदार नागो गाणार यांनीदेखील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे याप्रकरणी पाठपुरावा केला होता.

शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे, निरंजन गिरी यांनी मंगळवारी विधान भवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे पगार करण्याची मागणी केली असता मुख्यमंत्र्यांनी गणपतीपूर्वी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.