
सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेला निवतीचा निळाशार समुद्र नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. आता पर्यटकांच्या आनंदात आणखी भर पडणार आहे. निवतीच्या समुद्राखाली देशातील पहिलाच आगळावेगळा जलपर्यटन प्रकल्प साकारणार आहे. नौदलातून निवृत्त झालेल्या ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौकेचे रूपांतर निवती रॉकजवळ पाण्याखाली संग्रहालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी या युद्धनौकेभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला.
समुद्रात विराजमान होणाऱया जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाने या प्रकल्पासाठी ‘आयएनएस गुलदार’ हे जहाज विनामोबदला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. 83.9 मीटर लांब आणि 9.7 मीटर रुंद असलेल्या या जहाजाचे वजन 1,120 टन आहे. ते समुद्रात उभे राहिल्यानंतर 5.2 मीटर पाण्याखाली असते. 12 जानेवारी 2024 रोजी ते नौदलातून निवृत्त झाले. या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 46.91 कोटी रुपये दिले आहेत. ते सध्या अंदमानच्या पोर्टब्लेअर येथे असून तेथून कर्नाटकच्या कारवार नेव्हल बेसपर्यंत नौदलाकडून पोहोचवले जाणार आहे. हे जहाज 16 मार्च 2025 रोजी यशस्वीरीत्या कारवार येथून विजयदुर्ग येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जेट्टीवर आणण्यात आले.
पर्यटकांना प्रवाळ, समुद्रतळाची सफर घडणार
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (एमएमबी) विजयदुर्ग येथील जेट्टीला विनामोबदला साधारणपणे सहा ते सात महिने सदरचे जहाज सुरक्षितरीत्या ठेवण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. जहाजाची पर्यावरणीय साफसफाई करण्याकरिता नियुक्त केलेल्या संस्थेने या जहाजाची 15 एप्रिल 2025 रोजी पूर्णपणे पर्यावरणीयदृष्टय़ा साफसफाई केली आहे. हे जहाज सिंधुदुर्ग जिह्यातील समुद्राच्या तळाशी निवती रॉक येथील येथे विराजमान करण्याकरिता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांना आदेश देण्यात आला असून वातावरण अनुकूल असेल तेव्हा ते निवतीपर्यंत नेले जाणार आहे.