
राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मार्गदर्शक तत्त्वे ठरवून टप्प्याटप्प्याने महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. याची तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात बोलताना उदय सामंत म्हणाले की, सोमवारी विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली. सर्व विद्यापीठाचे कुलगुरू विद्यापीठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत. विद्यापीठे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
वसतीगृहही सुरू करणार
कोरोना काळात अनेक विद्यापीठांचे वसतीगृह क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत होते. अजूनही याठिकाणी वसतीगृहात कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे हे वसतीगृह योग्यरीत्या सॅनिटाइज करून त्यानंतर सुरू करण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
























































