विधान परिषदेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये धुसफूस, राम शिंदेंचे नाराजीचे ट्विट अन फडणवीसांनी….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची केलेली अदलाबदल आणि बड्या नेत्यांना डावलण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.  त्यामुळे भाजपमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. त्यातच माजी मंत्री राम शिंदे यांनी ट्विटरवरून थेट नाराजी व्यक्त करत याला वाचा फोडली आहे.

राम शिंदे यांनी ‘विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी विधान परिषदेसाठी नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील असे म्हटले होते. त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसांत चांगला अभ्यास केला त्यामुळेच रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. तसा अभ्यास मला आणि इतरांना जमला नाही’, असा टोला लगावत नाराजी व्यक्त केली आहे.

म्हणून एकनाथ खडसेंचं तिकीट कापलं, चंद्रकांत पाटील यांनी वादात ‘संघा’ला ओढलं

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने इच्छुकांची नावे मागण्यास सुरुवात केली होती, त्या वेळेला नगर जिल्ह्यातील इच्छुकांनी आपले नावे प्रदेशाध्यक्षाकडे पाठवलेली होती. माजी मंत्री राम शिंदे हेसुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनी सुद्धा त्याची तयारीही केली होती. मात्र निवड न झाल्यामुळे राम शिंदे यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली.

राम शिंदे यांनी केलेल्या ट्विटमुळे व त्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये हा विषय चांगलाच रंगू लागला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी नगर येथे येणार होते. मुंबईवरून नागपूरच्या दिशेने जाताना ते दुपारी नगर येथील शासकीय विश्रामगृह येणार होते. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बेरड यांच्यासह पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. नगर जवळ आल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नगरमध्ये आपण थांबणार नाही असे त्यांना सांगितले. त्यामुळे उलट-सुलट चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.