
राज्यातल्या पाणीटंचाईमुळे सध्या ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्यातल्या तब्बल एक हजार 300 हून अधिक वाडय़ा-वस्त्यांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या जिह्यांना 19 कोटी 53 लाख रुपये वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला आहे. राज्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहे, पण तरीही पाणीटंचाई कमी होताना दिसत नाही. त्याउलट यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष अधिकच जाणवू लागले आहे. सध्याच्या घडीला राज्यातील 355 गावे आणि 959 गावांना 377 टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर सुरू असलेल्या जिह्यांना एकूण 19.53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.























































