
गेले काही दिवस प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पुढील चार दिवस विचित्र वातावरण बदलाला तोंड द्यावे लागणार आहे. राज्याच्या काही भागांत कमालीचा उष्मा, तर काही भागांत अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने 10 जिल्ह्यांना उष्ण हवामानाबरोबरच अवकाळी पावसाचा ‘येलो ऍलर्ट’ जारी केला आहे. काही जिह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या आठवडय़ात पुन्हा उष्णतेची लाट धडकली आहे. काही जिह्यांचा पारा चाळिशीपार गेला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुरुवारी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर काहीसा गारवा निर्माण झाला, मात्र पुन्हा उष्णतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावती आणि वर्धा येथे बुधवारी देशातील उच्चांकी 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या तापमानवाढीने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. परभणी आणि अकोला येथे 39 अंशांपेक्षा अधिक, धुळे, मालेगाव, ब्रह्मपुरी, वाशीम, यवतमाळ येथे 38 अंश तापमानाची नोंद झाली. सोलापूर जिह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
शेतपिकाचे प्रचंड नुकसान
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱयांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या तडाख्याने हिरावला, असे दुःख शेतकऱयांनी व्यक्त केले.




























































