महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे व वादळामुळे निर्माण झालेल्या गंभीर नैसर्गिक आपत्तीची पाहणी करावी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने गुरवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली. नियमांचा काथ्याकूट न करता सरसकट सर्व प्रकारची मदत तातडीने जाहीर करण्याचे आदेश सरकारी यंत्रणेला द्यावेत, अशी विनंतीही राज्यपालांना या वेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. त्यावर शिवसेनेच्या मागणीबाबत केंद्राशी तातडीने संपर्क साधून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी राजभवनावर भेट घेतली. या वेळी शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना निवेदनही देण्यात आले. या निवेदनावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, गटनेते एकनाथ शिंदे व मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या सह्या आहेत. या शिष्टमंडळासोबत शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे तसेच शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात वादळाने झालेल्या नुकसानभरपाईची पाहणी करण्यासाठी दौऱयावर जाणार होतो; पण पक्षाच्या बैठकीमुळे दौरा झाला नाही. परंतु महाराष्ट्रात शेतकरी, मच्छीमार बांधवांना मदत करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. त्यापूर्वी आम्ही शिवसेनेच्या सर्व आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन विनंती केली की, पाऊस किंवा वादळामुळे नुकसान झाले असेल ते भरून देण्यासाठी जी काही यंत्रणा असते किंवा केंद्राकडून पाहणी पथक आमंत्रित करायचे असते ते तातडीने करावे आणि राज्यपाल जर स्वतःहून नुकसानीची पाहणी किंवा पंचनाम्याचे काम पाहू शकले तर योग्य होईल. कारण अजून महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. सध्या काळजीवाहू सरकार आहे. त्यामुळे राज्यपालांनी पुढाकार घेऊन लोकांना मदत करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.

निवेदनात काय म्हटले आहे

मागील काही महिन्यांत राज्याच्या सर्वच जिह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. अवकाळी पाऊस पडला. त्याचबरोबर ‘क्यार’ वादळामुळे अपरिमित हानी झाली. मनुष्यहानीही झाली. तसेच 328 पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. भात, कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्षे व इतर सर्व पिके तसेच हजारो एकर जमिनीवरील फळबागा नष्ट झाल्या. मच्छीमारांच्या नौका बुडल्या, मासेमारी पूर्ण बंद झाली. अवकाळी पावसामुळे राज्यातील बहुतांश विहिरी ढासळल्या. शेतकरी, फळ बागायतदार, शेतमजूर, मच्छीमार, पशुपालन अशा सर्वांना सरकारच्या मदतीची तातडीने गरज आहे. शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागांत फिरून जनतेला दिलासा देतच आहोत. पण आमची नम्र विनंती आहे की, महाराष्ट्रात उद्भवलेल्या या गंभीर नैसर्गिक आपत्तीची आपण स्वतः राज्याची पाहणी करून जनतेच्या दुःखाची दखल घ्यावी आणि राज्यातील जनलेला आधार देण्यासाठी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्य यंत्रणेला नियमांचा काथ्याकूट न करता सरसकट सर्व प्रकारची मदत तातडीने देण्याचे निर्देश आपण द्यावेत अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्यपाल लक्ष घालणार

शिवसेनेने केलेल्या मागणीवर राज्यपाल स्वतः लक्ष घालणार आहेत. आज रात्री राज्यपाल राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी बोलतील आणि केंद्रातून जे काही पाहणी पथक येणार आहे, आपण स्वतः केंद्राशी बोलणार आहोत. केंद्रीय पाहणी पथकाला बोलावून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

जनतेचा आवाज राजभवनवर

राज्यातील जनतेचा आवाज घेऊन आम्ही राजभवनावर राज्यपालांना भेटायला आलो होतो. आम्ही लोकांशी बांधील असून जनतेसाठी काम करीत आहोत. मागील पाच वर्षांपासून त्यांची मदत करीत आहोतच. आताही जाऊन त्यांची मदत करणार आहोत. सिंधुदुर्ग, मराठवाडा, रत्नागिरी, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा ज्या भागांत पावसामुळे नुकसान झाले त्या भागांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मी स्वतः तसेच शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार दौरा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.