
महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार मतांची चोरी करून स्थापन झालेले आहे. विधानसभा प्रचारावेळी राज्यात भाजपा कुठेच दिसली नाही. पण मतचोरी करुन सरकार आणले आहे. राहुल गांधी यांनी या मतचोरीचा जाब निवडणूक आयोगाला विचारला पण अद्याप आयोगाने उत्तर दिले नाही. विधानसभेची निवडणूक पराभूत झालो याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सोडलेला नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी म्हटले आहे. मुंबई काँग्रेस आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेत इम्रान प्रतापगढी बोलत होते.
प्रतापगढी पुढे म्हणाले की, देशात सरकार भाजपाचे आहे, पण संसदेत आवाज राहुल गांधी यांचाच चालतो. भाजपाने राहुल गांधी यांना शहजादा, राजकुमार म्हणून हिणवले. पण त्यांनी जेव्हा एक पांढरा टीशर्ट घालून कन्याकुमारी ते कश्मीर अशी 4 हजार किमीची पदयात्रा केली, तेव्हा 10 लाखांचा सुट व महागडा चष्मा घालणाऱ्यांनाही घाम फुटला होता. राहुल गांधी यांनी जाती जनगणना या सरकारकडून करुन घेऊ असे जाहीरपणे सांगितले आणि भाजपाच्या सरकारला ते करावे लागले, ही राहुल गांधी यांची ताकद आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असेही ते म्हणाले.
देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या परिस्थितीत संविधान बनवून ते लागू करणे कठीण काम होते. पण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दाखवले. आज तेच संविधान धोक्यात आहे. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांनी 2014 साली संसदेत प्रवेश करताना संसदेच्या पायऱ्यावर डोके टेकले होते आणि 2024 येता येता त्यांनी संसदच बदलून टाकली. 2024 साली मोदींनी संविधान डोक्याला लावले होते, त्यामुळे पुढचा नंबर संविधानाचा आहे, असंही ते म्हणाले.