
तापमानाचा चढलेला पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचे चटके महावितरणला बसत आहेत. सध्या महावितरणकडे दररोज जवळपास 22 हजार मेगावॅटहून अधिक विजेची मागणी नोंदली जात आहे. सदर मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून सुमारे आठ हजार तर खासगी वीज पंपन्यांकडून सात-आठ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे महावितरणला आयत्या वेळी केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून दररोज जवळपास सहा हजार मेगावॅटहून अधिक वीज जादा दराने घ्यावी लागत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणच्या डोक्यावरचा भार वाढत आहे.
महावितरणचे राज्यात अडीच कोटींहून अधिक वीज ग्राहक असून त्यांना दररोज जवळपास 22 हजार मेगावॅट विजेचा पुरवठा करावा लागत आहे. सदर मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरण- महानिर्मितीसह खासगी वीज पंपन्यांकडून वीज घेते. तसेच विजेची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून वीज खरेदी केली जाते. देशात विजेची मागणी कमी असताना पॉवर एक्स्चेंजमधून खरेदी केल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेचा दर दोन-अडीच रुपये एवढा कमी असतो. पण सध्या विजेची मागणी वाढलेली असल्याने देशातील सर्वच वीज वितरण कंपन्यांकडून दररोज पॉवर एक्स्चेंजकडे विजेची मागणी नोंदली जात आहे. त्यामुळे प्रतियुनिटची किंमत वाढली असून महावितरणला मार्चमध्ये सरासरी 3 रुपये 55 पैसे प्रतियुनिट दराने पॉवर एक्स्चेंजमधून वीज घ्यावी लागली आहे. महावितरण महिन्याला एक्स्चेंजमधून कोटय़वधी युनिट वीज घेत असल्याने त्याचा मोठा आर्थिक भार पडत आहे.
महावितरणचा भार ग्राहकांच्या डोक्यावर
वीज खरेदी कराराच्या माध्यमातून महावितरण घेत असलेल्या प्रतियुनिट विजेचा सरासरी दर साडेतीन रुपये एवढा आहे. याच्या तुलनेत केंद्रीय एक्स्चेंजमधून मिळणारी वीज स्वस्त असते, मात्र आता पॉवर एक्स्चेंजमधून जादा दराने वीज घ्यावी लागत असून त्याचा भार महावितरणवर पडत असला तरी भविष्यात तो वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांच्या डोक्यावर येणार असल्याचे वीजतज्ञ डॉ. अशोक पेंडसे यांनी सांगितले.
वीज खरेदी प्रतियुनिटचा वीजदर
- मार्च 166 दशलक्ष युनिट 3.55 रुपये
- फेब्रुवारी 18 दशलक्ष युनिट 2.83 रुपये
- जानेवारी 251 दशलक्ष युनिट 3.23 रुपये
- डिसेंबर 354 दशलक्ष युनिट 3.10 रुपये
- नोव्हेंबर 58 दशलक्ष युनिट 2.91 रुपये






























































