महावितरणने खरेदी केलेल्या तकलादू वीज मीटरचा 160 कोटींचा भार ग्राहकांच्या डोक्यावर

296

महावितरणने खरेदी केलेल्या रोलेक्स आणि फ्लॅश कंपनीच्या तकलादू वीज मीटरचा तब्बल 160 कोटी रुपयांचा भार सर्वसामान्य ग्राहकांच्या डोक्यावर पडणार आहे. रोलेक्स आणि फ्लॅश कंपनीचे सुमारे 10 लाख मीटर महावितरणने खरेदी केले असून ते वीज वापराचे रीडिंग चुकीचे नोंदवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने आतापर्यंत आठ लाख 27 हजार मीटर बदलून भंगारात काढले आहेत. त्यामुळे त्यावर खर्च झालेले 160 कोटी रुपयांचे महावितरणचे नुकसान झाले असून ते वीजदरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांवर येणार आहे.

महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी वीज ग्राहक आहेत. त्याच्या वीज वापराचे मोजमाप करण्यासाठी महावितरण रोलेक्स, फ्लॅश, एचपीएल आणि जीनियस कंपनीचे वीज मीटर खरेदी करते. मात्र फ्लॅश आणि रोलेक्स या कंपन्यांचे वीज मीटर तकलादू असून वीज वापराचे रीडिंग कमी जास्त नोंदवले जात असल्याचे 2018 मध्ये कल्याण परिमंडळात निदर्शनास आले होते. त्यानुसार महावितरणने दोन्ही कंपन्यांना काळय़ा यादीत टाकत त्यांनी पुरवलेले मीटर बदलण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार एप्रिल 2018 पासून आजपर्यंत फ्लॅश कंपनीचे 4 लाख 70 हजार, तर रोलेक्स कंपनीचे 3 लाख 57 हजार मीटर बदलले आहेत. सदर मीटर भंगारात काढल्याने आता वीज वापर अचूक नोंदला जात आहे. मात्र सदर मीटरच्या खरेदीवर झालेला 160 कोटी रुपयांच्या खर्चाचा भार ग्राहकांवर पडणार आहे. दरम्यान, तकलादू वीज मीटर बदलल्याने आता अचूक रीडिंग होत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

वसुलीसाठी महावितरण उच्च न्यायालयात

तकलादू वीज मीटरमुळे महावितरणच्या होणाऱ्या नुकसानीचा भार वीज दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांवर येणार आहे. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता संबंधित दोन्ही मीटर कंपन्यांना काळय़ा यादीत टाकले असून त्यांची अनामत रक्कम जप्त केली असल्याचे सांगितले. तसेच 160 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे त्याची वसुली झाल्यास ग्राहकांवर त्याचा भार पडणार नसल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या