महावितरण कृषी पंपाला पुरवणार ग्रीन एनर्जी!

राज्यातील कृषी पंपाला त्यांच्या एकूण वीज वापराच्या तब्बल पन्नास टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी पुरवण्याची महावितरणची योजना आहे. त्यासाठी तब्बल सात हजार मेगावॅट विजेच्या मागणीचे लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.

महावितरणकडून जवळपास पन्नास लाखांहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱयांना दररोज सुमारे 14 हजार मेगावॅट वीजपुरवठा केला जातो. सदरच्या विजेपैकी बहुतांशी पुरवठा रात्रीच्या वेळी केला जातो. शेतकऱयांची मोठी गैरसोय होत असून ती कमी करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत दिवसा पन्नास टक्के म्हणजे सात हजार मेगावॅट वीज पुरवण्याची महावितरणची योजना आहे. सदरची वीज दीर्घ काळासाठी खरेदी करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून लवकरच टेंडर काढले जाईल, अशी माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.