सामना प्रभाव – घारापुरी बेट उजळणार; महावितरणला जाग, उपकेंद्राची दुरुस्ती युद्धपातळीवर

घारापुरी बेटावर गेल्या तीन महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होत होता. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पर्यटक, नागरिक आणि व्यावसायिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. या समस्येविरोधात दैनिक ‘सामना’ने आवाज उठवल्यानंतर महावितरण खडबडून जागे झाले. न्हावा-टीएस रेहमान येथील २२ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. यामुळे घारापुरी बेट उजळणार आहे.

महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे घारापुरी बेटावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा करणेही ग्रामपंचायतीला अशक्य होत होते. त्यामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. याबाबत दैनिक ‘सामना’ने ‘घारापुरी बेटावर ब्लॅकआऊट’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर महावितरणच्या मुख्य अभियंता भांडुप कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली. एलिफंटा बेटावर वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात आली असून न्हावा-टीएस रेहमान येथील २२ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरण जनसंपर्क अधिकारी ममता पाण्डेय यांनी दिली.

तक्रारींचे निवारण होणार

घारापुरी बेटाचा विद्युत पुरवठा ३३/२२ केव्ही टीएस रेहमान उपकेंद्रातून केला जातो. या उपकेंद्रात आर्दता व दमटपणामुळे शॉर्टसर्किट झाल्याने विद्युत पुरवठा २२ केव्ही गव्हाण फिडरवर चालू करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून ल वकरच उपकेंद्रातील दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. बेटावरील तक्रारींच्या निवारणासाठी गव्हाण येथे सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.