
कामाचा बोझा व आर्थिक चणचणीमुळे 2005मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे (एमएसईबी) तत्कालीन सरकारने महावितरण, महानिर्मिती व महापारेषण असे तीन तुकडे केले होते. आता त्यातील महावितरण पंपनी कर्जाच्या बोजाखाली दबली गेल्याने तिचे पुन्हा दोन तुकडे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महावितरणचे विभाजन करून कृषी आणि बिगरकृषी ग्राहकांसाठी दोन स्वतंत्र पंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्यातील बिगरकृषी कंपनी शेअर बाजारातही उतरणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यात महावितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महावितरणचे दोन भाग केले जाणार आहेत. त्यातील महावितरण ही कंपनी औद्योगिक, व्यापारी, घरगुती व अन्य बिगरकृषी ग्राहकांना वीज वितरण करेल तर दुसरी एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) कंपनी शेतकरी व कृषी ग्राहकांना वीज वितरण करेल. या विभाजनाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
बिगर कृषी वितरण क्षेत्रातील महावितरण पंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यासदेखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. महावितरण कंपनीने विविध योजनांसाठी घेतलेल्या सुमारे 32 हजार 679 कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी आहे. या कर्ज दायित्वापोटी राज्य शासन पंधरा वर्षे मुदतीचे दीर्घकालीन सरकारी शेअर्स जारी करणार आहे.
एमएसएपीएल ही कंपनी केवळ कृषी ग्राहकांना वीजपुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देईल. तिला सुरुवातीचे भांडवल म्हणून अडीच हजार कोटी रुपये देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मात्र दोन्ही कंपन्यांच्या वीज विक्री, उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा स्वतंत्रपणे मांडला जाणार आहे.
शेतकरी व सामान्य ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा
या दोन्ही कंपन्यांच्या स्थापनेमुळे कृषी तसेच औद्योगिक, घरगुती ग्राहकांना स्थिर व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देता येणार आहे. विशेषतः शेतकऱयांना दिवसा व अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. तसेच घरगुती ग्राहकांसाठी वीज दरांमध्ये अधिक स्थिरता येईल, असा दावा सरकारने केला आहे.
तोटय़ातल्या कंपनीचे शेअर्स विकले जाणार का?
महावितरणने शेअर बाजारात उतरण्याचा निर्णय घेतला असला तरी या तोटय़ातल्या कंपनीच्या शेअर्सना प्रतिसाद मिळेल का? भविष्यात या कंपनीचे शेअर्स घसरले तर ती कंपनीच बंद करावी लागेल किंवा अदानींसारख्या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना ती विकावी लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

























































