
ठाणे, भांडुप, मुलुंड, नवी मुंबई, पनवेल, तळोजा व उरण परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील महसूलदृष्टय़ा सक्षम व महत्त्वाच्या असणाऱया क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवान्यासाठी अर्ज केला आहे. अदानी कंपनीला हा परवाना मिळाल्यास महावितरणच्या उत्पन्नाला मोठा फटका बसणार असून, शेतकऱयांना होणाऱया वीजपुरवठय़ातही अडचणी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीकडून राज्यात आजपासून तीनदिवसीय संप पुकारण्यात आला होता. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या संपाचा फटका बसला. कोयना जलविद्युत प्रकल्पातून विजनिर्मिती सुरू असली, तरी त्यात निम्म्याने घट झाली होती, तर नगर शहरासह जिह्यात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ावरही परिणाम झाला आहे, तर कोल्हापुरातील चार हजारांहून अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. सोलापुरातील सहा हजार कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे काही भागात विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, सायंकाळी संप मागे घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत होता.
‘कोयने’च्या वीजनिर्मितीत घट
खासगीकरणाच्या विरोधात मंगळवारी मध्यरात्रीपासून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपाचा फटका अन्यत्र बसला असला तरी कोयनेच्या वीजनिर्मितीवर या संपाचा परिणाम झाला होता. कोयना जलविद्युत प्रकल्पातून अखंडितपणे वीजनिर्मिती सुरू असली तरी त्यात निम्म्याने घट झाली होती. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चारही टप्प्यांतून वीजनिर्मिती सुरू होती. मात्र, त्यात एक हजार मेगावॅटची घट झाली होती. दरम्यान, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा 36 मेगावॅट क्षमतेचा पायथा वीजगृह सिंचनाला पाणी सोडल्यावर वीजनिर्मितीसाठी सुरू असतो. सध्या सिंचनासाठी पाणी सोडणे बंद असल्यामुळे हा प्रकल्प बंद आहे.
सोलापुरात विजेचा लपंडाव
वीज कंपन्यांच्या खासगीकरणाविरोधात पुकारलेल्या वीज कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे सोलापुरात आज काही ठिकाणी बत्ती गूल झाल्याने कामे थंडावली होती, तर काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. याचा फटका सर्वसामान्यांना बसला. सोलापूर जिह्यातील जवळपास सहा हजार कर्मचारी खासगीकरणाला विरोध करत संपावर गेल्याने काही भागात विजेची सेवा बंद पडली होती. त्यामुळे अनेक कार्यालयांत, खासगी व्यवस्थापनाचे कार्यालय, दुकानदार यांची खूपच तारांबळ उडाली होती. काही भागात दिवसभर वीज बंद-चालू होत होती.
नगर जिह्यातील तीन सबस्टेशन बंद
महावितरणच्या संपामुळे नगर जिह्यातील तीन सबस्टेशन बंद झाले होते, त्यात जामखेड, नेवासा आणि शहरातील भिंगार सबस्टेशनचा समावेश आहे. महावितरणच्या नगर कार्यालयातील 528 पैकी अवघे 36 कर्मचारी कामावर हजर होते. त्यात एक अधीक्षक अभियंता आणि सहा कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. बंद असलेल्या सबस्टेशनवर फिडर ट्रिप झाल्याने वीजपुरवठा बंद असल्याचे सांगण्यात आले. काल रात्रीपासूनच शहरासह उपनगरातील काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला. औद्योगिक वसाहतींमध्येही काही ठिकाणी वीज नसल्याने कामकाज ठप्प झाले होते. सावेडी उपनगरात मध्यरात्रीपासूनच वीज गूल झाली आहे. थंडीचे दिवस असल्याने पंखे, कुलरची गरज नसली तरी पाण्याच्या मोटारी, मोबाईल चार्जिंगचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
महावितरण कर्मचाऱयांच्या आंदोलनाला आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके यांच्यासह नगर शहर शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, संदीप दातरंगे, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, महापालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे उपस्थित होते.
नगरचा पाणीपुरवठा तीन दिवस विस्कळीत
महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा केंद्र वसंत टेकडीसह आरटीओ, सरोष पाण्याची टाकी येथील वीजपुरवठा मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद झाला होता. वीजपुरवठा सुरू करण्याबाबत वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, अधिकाऱयांना महापालिकेकडून वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच वसंत टेकडी येथील महावितरणचे कार्यालयही बंद होते. वारंवार विनंती केल्यानंतर अखेर सकाळी 9.30 वाजता वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, वीजपुरवठा सलग 9 ते 10 तास बंद राहिल्याने वसंत टेकडी येथील उपनगर भागासाठी पाणी वाटपाची टाकी व शहराच्या मध्यवर्ती भागासाठी पाणीपुरवठा होत असलेली आरटीओ व सरोष पाण्याच्या टाक्या भरता आल्या नाही. त्यामुळे पुढील तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.





























































