मुंबईत आज महायुतीची प्रचंड सभा; नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बीकेसीमध्ये शुक्रवार, 26 एप्रिल रोजी प्रचंड सभा होणार आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सायंकाळी थेट मुंबईत होणाऱया सभेस उपस्थित राहणारे पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे विरोधकांचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईवर लक्ष केंद्रित केले असून गल्लीबोळातून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबईतील सहाही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून दक्षिण मुंबईपासून उत्तर मुंबईपर्यंत शिवसेना-भाजप उमेदवारांचाच बोलबाला आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्प्यात मुंबईत बीकेसी मैदानावर प्रचंड सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे उपस्थित राहणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज 26 एप्रिल रोजी भरणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः उपस्थित राहून नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणार आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

अशी असेल सभास्थळावरची व्यवस्था

  • बीकेसीमध्ये होणाऱया अतिविराट सभेत भारत डायमंड बोर्ससमोरच्या गेट क्रमांक 2 मधून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल.
  • या व्यक्तींमध्ये मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, शिवसेना नेते, उपनेते, विभागप्रमुख, शिवसेना संघटक, समन्वयक आदिंना प्रवेश देण्यात येईल.
  • अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाडय़ा गेट क्रमांक 2 समोर सोडल्यानंतर  पुढे या गाडय़ांच्या पार्ंकगची व्यवस्था भारत डायमंड बोर्समध्ये करण्यात येईल.
  • शिवसेनाप्रेमी, भाजपप्रेमी, शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मैदानात खुला प्रवेश देण्यात येईल.
  • सभेला प्रचंड गर्दी होणार असल्याची बाब लक्षात घेऊन सर्वांनी सभेच्या वेळेआधीच मैदानात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून प्रत्येकाला बसण्यासाठी जागा मिळेल.
  • अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सोडून इतरांसाठी एमटीएनएल जंक्शनच्या पाठीमागच्या मैदानावर पार्ंकगची व्यवस्था करण्यात आली आहे.

व्यासपीठावर कोण… पंतप्रधान कार्यालयातून ठरणार

या सभेत व्यासपीठावर कोण मंत्री, खासदार, आमदार उपस्थित असणार, व्यासपीठाच्या बाजूला कुठल्या व्यक्ती असतील इत्यादी बाबी पंतप्रधान कार्यालयातून निश्चित करण्यात येतील, असे भाजपचे महामंत्री सुमन घैसास यांनी कळवले आहे.

सभा 5 वाजता सुरू होणार

सभा सायंकाळी ठीक 5 वाजता सुरू होणार आहे हे लक्षात घेऊन सभेला येणाऱयांनी वेळेआधी बीकेसी मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.