
>> महेंद्र पाटील
सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय़ जर विचारलं तर कुणीही सांगेल ‘के’ या आद्य अक्षरावर त्यांच्या चित्रपटाचे सर्व शीर्षक असतात, पण त्यांचे चित्रपट नीट पहिले तर अजून एक साम्य त्यात दिसून येतं. राकेश रोशन यांची अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून जी कारकीर्द आहे, त्याचं प्रतिबिंब त्यांच्या चित्रपटांवरही पडलेलं दिसून येतं. राकेश रोशन यांनी ‘घर घर की कहानी’ या चित्रपटापासून अभिनयाची कारकीर्द सुरू केली. खूबसूरत, पराया धन, कामचोर, आखों आखों मे, आख मिचोली, मन मंदिर, प्रियतमा, खेल खेल मे… चित्रपटांत अभिनय केल्यानंतर त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे आपला मोहरा वळवला. त्यांनी ‘खुदगर्ज’पासून दिग्दर्शनामध्ये पदार्पण केले. तो एक उत्तम मसालापट होता जो लोकप्रिय ठरला. त्यानंतर त्यांनी केलेले काही चित्रपट म्हणजे खून भरी मांग, किशन कन्हैया, खेल, कोयला, करण अर्जुन, कहो ना प्यार है, कोई मिल गया, ािढश…
त्यांच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतला नायक हा चित्रपटाच्या पूर्वार्धात अतिशय दुबळा, कमजोर असतो आणि प्रचंड अन्याय सहन करणारा असतो. मग तोच दुबळा नायक मध्यांतरानंतर अतिशय शक्तीशाली होतो. त्याच्या स्वभावात कमालीचा बदल होऊन तो व्हिलनला पुरून उरतो. हा एक धागा पकडून त्याभोवती वेगवेगळ्या कथा गुंफून, या सूत्राला धरून राकेश रोशन यांनी वर सांगितलेले चित्रपट दिग्दर्शित केले. ‘खून भरी मांग’ हा स्त्राrप्रधान चित्रपट होता. त्यात रेखाने साकारलेली व्यक्तिरेखा याच प्रकारात मोडणारी होती आणि जवळपास प्रत्येक कथेत सूड घेणं हा घटकसुद्धा तोच होता. ‘कोयला’मधील शाहरुख खानने साकारलेली व्यक्तिरेखासुद्धा अशीच होती. ‘करण अर्जुन’ मध्ये जुन्या काळात येऊन गेलेला विषय त्यांनी नव्याने मांडला.
पुढे त्यांनी आपला मुलगा हृतिक रोशन याला नायक म्हणून सादर करतानाही हाच साचा ठेवून एक चकाचक प्रेमकथा मांडली. नंतर आलेल्या ‘कोई मिल गया’ या साय-फाय सिनेमाने सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. एलियनचा समावेश करून आपला जुनाच साचा नव्या रूपात वेगळ्या ढंगात सादर केला. ‘ािढश’मध्येही तशाच पद्धतीचे कथासूत्र कायम ठेवून पुढे अजून भाग निर्माण केले आणि प्रत्येक वेळी यश मिळवून हाच सुपरहिट फॉर्म्युला कायम ठेवला. ज्या वेळी त्यांनी त्यांचा हा नेहमीचा यशस्वी साचा बदलून काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अपयश आलं. कारोबार, खेल, किंग अंकल हे चित्रपट त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणे यश मिळवू शकले नाही. म्हणून कदाचित त्यांना अपेक्षित असणारा नायक आणि ‘के’ हे अक्षर घेऊन त्यांनी एकच धागा पकडून अनेक लोकप्रिय चित्रपट दिले.
त्यांच्या कारकीर्दीचा विचार केला तर नायक म्हणून ते लोकप्रिय होते, पण ते सुपरस्टार म्हणून कधीच ओळखले गेले नाहीत. हा होता त्यांच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध…पण पुढे उत्तरार्धात निर्माते-दिग्दर्शक म्हणून त्यांनी अमाप यश मिळवले. मध्यांतरानंतर (उत्तरार्धात) ते खऱ्या अर्थाने हीरो झाले. कधी कधी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचा प्रभाव मनाच्या आत कुठेतरी दडलेला असतो आणि तो प्रभाव कामात, कलाकृतीत दिसून येतो. असंच काहीसं राकेश रोशन यांच्या बाबतीत दिसून येतं.



























































