धोनीने आता संन्यास घ्यावा, सुनील गावस्कर यांचा सल्ला

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोन याने आता निवृत्त व्हावे असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे. धोनीची वेळ आता संपली असून निवड समितीने त्याला पर्याय शोधायला हवेत असं गावस्कर म्हणाले आहेत. गावस्कर यांच्या मते रिषभ पंत हा धोनीसाठी योग्य पर्याय आहे.

कर्णधार विराट कोहली याने मात्र गावस्कर यांच्यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं आहे. त्याने शनिवारी पत्रकारांशी बोलताना धोनीचं प्रचंड कौतुक केलं होतं. 38 वर्षांच्या धोनीसाठी सध्या कोणीही पर्याय नाहीये असं त्याने म्हटलं होतं. कोहली म्हणाला की ‘तुम्ही ही गोष्ट मान्य करा अथवा नका करू, मात्र अनुभव हा अत्यंत गरजेचा असतो. अनेक खेळाडूंनी हे सिद्ध केलं आहे की वय हे फक्त आकड्यांपुरता मर्यादीत असतं. ही गोष्ट धोनीने अनेकदा सिद्ध करून दाखवली आहे’ धोनीने संन्यास केव्हा घ्यायचा हे त्यानेच ठरवावे आणि हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. इतर कोणी याबाबत त्यांचे सल्ले देण्याची गरज नाहीये.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान धोनीने संथ खेळ केला होता. यावरून त्याच्यावर बरीच टीका झाली होती. धोनीने आता संन्यास घ्यायला हवा असा तेव्हापासून अनेकांनी सल्ला द्यायला सुरुवात केली होती. त्याने संन्यास घ्यावा अथवा घेऊ नये यावरून क्रिकेट रसिकांमध्ये दोन गट पडले आहेत.

सुनील गावस्कर यांनी ज्या रिषभ पंतला धोनीचा पर्याय म्हणून सांगितले आहे, त्याच्या कामगिरीवर स्वत: प्रशिक्षक रवी शास्त्री खूश नाहीयेत. रिषभने वेस्ट इंडीज दौऱ्यात ज्या चुका केल्या त्या त्याने पुन्हा पुन्हा केल्यास त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. मोहालीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकताच दुसरा T20 सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यामध्ये पंत फक्त 4 धावांवर बाद झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या