
>> महेश उपदेव
राज्याच्या उपराजधानीजवळील छोटय़ाशा गावातून आलेल्या व जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध मेंदूरोगतज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मेंदू विकारावरील जनजागृतीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मूळचे उमरेड तालुक्यातील सेव या लहानशा खेडय़ातून थेट जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ. मेश्राम अशी त्यांची ओळख आहे. डॉ. मेश्राम गत 30 वर्षांपासून मेंदू विकारावर वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी नागपूरच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून (मेडिकल) एमबीबीएस व एमडी केल्यानंतर विदेशातून शिक्षण घेतले.
हिंदुस्थानात परतून त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. देशातील आघाडीचे मेंदूविकार तज्ञ असा त्यांचा लौकिक आहे. रुग्णांवर उपचारासोबतच मेंदूरोगासंदर्भात जनजागृतीतही ते कायमच आघाडीवर असतात. ते सध्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (डब्ल्यूएफएन) चे विश्वस्त आहेत. या संघटनेचे जगभरात रशिया, युरोप आणि भारत तीनच देश विश्वस्त असून डॉ. मेश्राम हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करीत आहेत. पक्षघात, अपस्मार, मिरगी अशा मेंदूरोग विकारांवर जनजागृती संदर्भातील त्यांच्या कार्याचा आवाका जगातील 124 देशांपर्यंत विस्तारला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त या पदावर 2022 मध्ये ते निवडून आले. 65 वर्षांच्या इतिहासात या पदावर निवड झालेले देशातील पहिले मेंदूरोगतज्ञ आहेत. एका खेडय़ातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीच्या विश्वस्त पदापर्यंतचा प्रवास महत्त्वाचा आहे. 2021 मध्ये डॉक्टरांची दुसऱयांदा निवड झाली आहे. वर्ल्ड फेडरेशनच्या 2017 ते 2022 सदस्य, वैज्ञानिक कार्यक्रम समितीचे सदस्य तसेच बँकॉक, मराकेश, व्हिएना, स्टॉकहोम, सॅरियोगा, क्योटा आणि दुबई येथे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजिस्टच्या प्रतिनिधींच्या सात परिषदांमध्ये राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले. ते महाराष्ट्र असोसिएशन ऑफ न्यूरॉलॉजी आणि विदर्भ न्यूरो सोसायरीचे माजी अध्यक्ष आहेत.
सार्वजनिक आरोग्य शिक्षणासाठी विविध वर्तमानपत्रांत 400 आर्टिकल प्रकाशित झाली आहेत. नागपूर शहर, स्वच्छ भारत अभियनात ब्रॅण्ड अॅम्बेसॅडर म्हणून काम बघितले आहे. वरोरा येथील बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीचे ते सदस्य आहेत. त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघाचे सदस्य तसेच नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य, आयकर विभागाच्या वतीने हॉनेस्ट इन्कम टॅक्स पेयी म्हणून डॉ. मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला आहे. नागपूर विद्यापीठाकडून त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे. आजपर्यंत झालेल्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सहा वेळा त्यांच्या मार्गदर्शनात आयोजन करण्यात आले. सम्यक मेडिकल फाऊंडेशनचे ते अध्यक्ष असून आतापर्यंत 50 गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली आहे. डॉ. मेश्राम यांचे भाऊ डॉ. सुरेश मेश्राम हे मुंबईला महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून निवृत्त झाले, तर डॉ. शिरीष मेश्राम उमरेड येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. ‘‘मला पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याचा मनापासून आनंद आहे. वैद्यकीय सेवेचा घेतलेला वसा मी हयात असेपर्यंत असाच सुरूच राहील. या पुरस्काराने रुग्णसेवेचे बळ आणखी वाढले आहे,’’ असे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.

























































