
स्त्रिया आणि मुलांच्या प्रगतीसाठी ‘महिला विकास मंडळ, कुलाबा’ या संस्थेची स्थापना झाली. संस्थेला 71 वर्षे पूर्ण झाली असून या कालावधीत आलेल्या सर्व अडचणींवर मात करून मोठय़ा धैर्याने मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
‘महिला विकास मंडळ, कुलाबा’ या सामाजिक संस्थेची स्थापना 24 ऑगस्ट 1951 रोजी झाली असून सुशीला काशीकर, इंदूमती फडके, इंदिरा वाकनीस, कमलिनी देशमुख, सुधा कोरके या मंडळाच्या संस्थापिका आहेत. 10 ऑगस्ट 1953 मध्ये संस्था नोंदणीकृत झाल्यानंतर संस्थेच्या उपसमित्या स्थापन झाल्या.
बाल विकास मॉडर्न नर्सरी स्कूल सुरू झाले. शाळा समिती, विकास केंद्र समिती, वत्तृत्व कला समिती स्थापन झाली. ललित कला समिती, क्रीडा समिती आणि इमारत समिती स्थापन झाली. 1991 मध्ये संस्थेचे ‘श्रमिक महिला वसतिगृह’ बांधून पूर्ण होऊन कार्यरत झाले. नोकरी करणाऱ्या 100 मुलींच्या राहण्याची इथे सोय आहे.
मुंबईतील निरनिराळय़ा विभागांतील स्त्रियांना एकत्र आणणे, मंडळाच्या उद्देशाला पोषक होईल अशा रीतीने इतर संस्थांशी सहकार्य करणे, श्रमिक महिलांसाठी निवासाची सोय करणे तसेच सभासदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना निरनिराळय़ा सुविधा उपलब्ध करून देणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत.
मंडळाच्या हिरक महोत्सवी वर्षापासून उत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेसाठी 25 हजार रुपये आणि ‘महिला विकास मंडळ कार्यगौरव पुरस्कार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याचप्रमाणे सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग या पाच क्षेत्रांपैकी दरवर्षी एका क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलेला 21 हजार रुपयांचा ‘महिला विकास मंडळ सन्मान पुरस्कार’ देण्यात येतो.
>> अनघा सावंत
























































