
श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव परिसरातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पसार झालेला मुख्य आरोपी रमेश रामलाल मुथ्था व त्याचा मुलगा भूषण या दोघांना जालना येथून पकडण्यात श्रीरामपूर तालुका पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी मुन्ना ऊर्फ गणेश रामलाल मुथ्था व त्याची पत्नी आशा या दोघांना गणपुर (ता. चोपडा,) येथून तर चांदणी मुथ्था हिला वलसाडा (साक्री) येथून ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणातील तीन आरोपींना पकडले तरी मुख्य सुत्रधाराचा शोध घ्यावा असा दबाव पोलिसांवर होता. निरीक्षक मधुकर साळवे यांना पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे निरीक्षक साळवे यांच्यासह पथकाने जालना येथे जाऊन मुख्य आरोपी रमेश रामलाल मुथ्था व त्याचा मुलगा भुषण यांना अटक केली.
दोन वर्षांपूर्वी मुथ्था याने माळवडगावात भाड्याच्या घरात किराणा दुकान सुरू केले. नंतर चंदन ट्रेडर्स या नावाने होलसेल किराणा, भुसार माल खरेदी विक्री व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच त्याने माळवडगावसह मुठेवडगाव, खानापूर, भामाठाण, खोकर, भोकर या भागातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून कोट्यावधी रुपयांचा शेतमाल मुथ्था घेत होता. अडचणीच्या काळात तसेच जादा व्याजाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना पैसे देत. 6 फेब्रुवारी रोजी पहाटे कोट्यावधी रुपये घेऊन मुथ्था कुटुंबासह पसार झाला होता.
या बाबत शेतकऱ्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात रमेश रामलाल मुथ्था, चंदन रमेश मुथ्या, भुषण रमेश मुथ्था, मुन्ना ऊर्फ गणेश रामलाल मुथ्था याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पदभार स्वीकारताच मुथ्था याचा शोध सुरू केला. प्रथम गणेश मुथ्था व पत्नी आशा यांना गणपूर (ता.चोपडा जि.जळगाव) तर चांदणी मुथ्था हिला वलसाडा (साक्री) येथून ताब्यात घेतले होते. तर शुक्रवारी जालना येथून मुख्य आरोपी रमेश मुथ्था व मुलगा भुषण याला अटक करण्यात आली.




























































