
मागील काही दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माजलगाव मतदारसंघात लहान-मोठे तलाव तुडुंब भरून वहात असून या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले तर वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव ते भीमनाईक तांडा जोडणारा पूल वाहून गेल्याने तांड्यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर पात्रूड येथील नदीला रविवारी पहाटेच्या पावसाने पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला.
यावर्षी सुरुवातीपासूनच दमदार पावसाने सुरुवात केली आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील माजलगाव धरणाची पाणीपातळी वाढली आहे तर लहान, मोठे तलावभरून वाहत आहेत.
देवडी-खळवट लिमगाव गावातील नद्यांना पूर आल्याने, हरिश्चंद्र पिंपरी, चिंचवडगाव गावांचा संपर्क तुटला आहे. तर पात्रूडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पात्रूडच्या सरस्वती नदीला पूर आल्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या पूल खचला, त्यामुळे लोणगाव, देवळा, नाकलगाव, जीवणापूर, उमरी-पारगाव गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतकरी आनंदला असून पेरणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.



























































