लेख – शापित गंधर्व

458

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता राजन पाटील यांचे ‘माझी माणसं’ हे पुस्तक संवेदना प्रकाशनाद्वारे आज प्रसिद्ध होत आहे. लेखकाच्या गोतावळ्यातील हृदयस्थ माणसांचा करून दिलेला हा परिचय असंच या पुस्तकाचं वर्णन करता येईल. वेगळय़ा अभिनयाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी चंदू पारखी यांच्याविषयी असणाऱया लेखातील काही भाग…

साल 1984. मी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर नुकतंच पदार्पण केलं होतं. ‘तुफानाला घर हवंय’ आणि ‘राजू तू खरं सांग’ या दोन नाटकांत रिप्लेसमेंट केली होता. त्याच वेळी ‘नाटय़ संपदा’ या व्यावसायिक नाटय़ संस्थेची जाहिरात पाहिली. संस्थेचे प्रमुख प्रभाकर पणशीकर. त्यांना नवीन कलाकारांना घेऊन नाटक करायचे होते. त्यासाठी ते ऑडिशन घेणार होते. मी ऑडिशनला गेलो. सिलेक्टही झालो. नाटकाचे नाव ‘निष्पाप!’ तालमी सुरू झाल्या. नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची तारीखही निश्चित झाली. पण त्या तारखेला तेरा-चौदा दिवस असताना सुहास पळशीकर याची आई आजारी पडली. तो तातडीने हैदराबादला निघून गेला. त्याची आई गेली. त्यामुळे त्याने सांगितले की, ‘मी नाटकात काम करू शकणार नाही. सॉरी.’ मग तातडीने सुहासच्या बदली कोणाला घ्यायचे यावर खल सुरू झाला. अमरापूरकर आणि पणशीकर यांचे एकमत झाले. चंदू पारखी. मी चंदूला प्रथमच पाहिलं. उंच, अत्यंत हडकुळा, गाल खप्पड बसलेले, चेहऱयावर ‘खूप सोसलंय’ असे भाव, चालताना जाणारा तोल आणि खर्जातला खरखरीत आवाज. डोळे तर इतके निस्तेज की नाटकातला बिलंदर खलपुरुष हा कसा करेल याची आम्हाला काळजी वाटू लागली.

मी चंदूच्या तालमी घेणं सुरू केलं आणि मला जाणवलं की, या माणसात अमर्याद गुणवत्ता ठासून भरलीय. आमच्या नाटकात काम करण्यापूर्वी चंदू मिळेल त्या नाटकात नगण्य भूमिका करायचा. खरं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट. इंदौरला तो सरकारी नोकरीत होता. तिथे तो हौशी/प्रायोगिक नाटकातून काम करायचा. बाबा डिके हे त्याचे गुरू. मुंबईतल्या एका रंगकर्मीने चंदूला मुंबईत आणले. पण पुढे चंदूला कामं मिळेनात आणि मिळाली तरी नोकराची वगैरे. त्यामुळे त्याचे खाण्याचेही वांदे होते. शिवाजी मंदिरच्या कट्टय़ावर जिथे पथारी पसरता येईल तिथे झोपायचा. कोणी वडापाव दिला तर खायचा. पण कधीही, कोणाकडेही हात पसरला नाही. म्हणायचा, ‘‘मी सरकारी नोकरी सोडून नट होण्यासाठी मुंबईला आलोय. मी नटच होणार. नाही झालो तरी पुन्हा इंदोरला नाही जाणार. इथंच मरण पत्करेन.’’ हे सगळं आम्हाला चंदूनेच नंतर सांगितलं.

‘‘निष्पाप’चे शुभारंभाचे प्रयोग शिवाजी मंदिरला होते. दोन प्रयोग. सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी चार वाजता. दोन्ही प्रयोग सुंदर झाले. प्रेक्षकांत डॉ. काशीनाथ घाणेकर, सुलोचनाबाई, अरुण सरनाईक असे अनेक मान्यवर होते. सर्वांनी नाटकाचे कौतुक केले. चंदूवर तर प्रेक्षक जाम खूश होते. ‘‘चंदूला पाहिल्यावर निळू फुले यांची आठवण येते,’’ असे सगळे म्हणायचे. चंदू एका रात्रीत स्टार झाला. चंदूचे चांगले दिवस सुरू झाले. चंदू हिंदी मालिका करू लागला. ‘जबान संभालकें’ ही त्याची सिरियल फारच पॉप्युलर झाली. दरम्यानच्या काळात लग्न करून तो स्थिरस्थावरही झाला होता. हे सगळं व्यवस्थित चालू असतानाच एकदा सकाळी त्याचा फोन आला. गुवाहाटीला शूटिंग करताना चंदूच्या पायाला किडा चावला होता. ती जखम बरी होत नव्हती. त्याच रात्री उशिरा शुभांगी जोशींचा फोन आला की, चंदूला आयसीयूत घेऊन गेलेत. कानावर आलेली बातमी वाईट होती. चंदूने या जगाचा निरोप घेतला होता. चंदूचा मृत्यू हा सर्वांसाठी अनपेक्षित, धक्कादायक होता. नियतीने चंदूला जसे प्रकाशात आणले तसेच ती त्याला घेऊनही गेली. पण रंगभूमीवरच्या या शापित गंधर्वाला लोक कधीच विसरणार नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या