नंदुरबारजवळ खासगी बस दरीत कोसळली; 5 ठार, 31 जखमी

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात बुधवारी मध्यरात्री खासगी पंपनीची ट्रॅरव्हल्स बस 40 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर 31 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोंडाईबारी घाटात बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जळगावहून सुरतकडे निघालेल्या शुभ ट्रॅव्हल्सच्या बसने पाठीमागून धडक दिल्याने किंग ट्रॅव्हल्सची बस पंधरा फूट पुढे फेकली गेली. तर चालकाचे नियंत्रण सुटून शुभम ट्रॅव्हल्सची बस 40 फूट खोल दरीत कोसळली. किंग ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने याबाबत नंदुरबार पोलिसांना माहिती दिली. आठ तासांच्या अविरत प्रयत्नानंतर खोल दरीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

या अपघातात बसचालक वरतीचंद मेघवाळ, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील क्लीनर गणेश ऊर्फ पप्पू, भुसावळच्या जाम मोहल्ला येथील शमशुद्दीन शेख, सुरतच्या प्रतिभा मरोटी व पाचोरा तालुक्यातील वरखडी येथील अमर बारी या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सुनील साळुंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशोर नवले, विसरवाडीचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील आदींनी पथकासह घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले.

जेलरोडला अपघातात दांपत्य ठार

नाशिकरोडच्या जेलरोड भागात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. नांदूर नाक्याहून सिन्नरला जाणाऱया ट्रकने जेलरोड येथील कन्या शाळेजवळ दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर तालुक्यातील कोळपेवाडी येथील ट्रकचालक शेख हसन शेख भिकन (48) याला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या