पश्चिम रेल्वेवर पुन्हा मोठा ब्लॉक; आज, उद्या तब्बल २१५ लोकल फेऱ्या रद्द

कांदिवली–बोरिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वे पुन्हा मोठा ब्लॉक घेणार आहे. मंगळवारी आणि बुधवारी, या दोन दिवसांत लोकल ट्रेनच्या तब्बल २१५ फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये अप दिशेने धावणाऱ्या १०९ लोकल, तर डाऊन दिशेने धावणाऱ्या १०६ लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. परिणामी लोकल सेवेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

कांदिवली आणि बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वे २० डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपासून ३० दिवसांचा ब्लॉक घेत आहे. या ब्लॉकचा पश्चिम रेल्वेच्या अनेक लोकल सेवांवर परिणाम होत आहे. मंगळवारी मध्यरात्री मोठा ब्लॉक घेऊन महत्त्वपूर्ण कामे केली जाणार आहेत.

अप जलद मार्गावर मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून ते सकाळी ५.३० वाजेपर्यंत, तसेच डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने सोमवारी दिली. या काळात पाचव्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मेल व एक्सप्रेस गाड्यांचीही रखडपट्टी होणार आहे.

१५ डब्यांच्या आणि एसी लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम

मंगळवारी अप व डाऊन मार्गावर १५ डबा लोकलच्या १४ फेऱ्या, तर एसी लोकलच्या ५ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसेच बुधवारी १५ डबा लोकलच्या १९ फेऱ्या आणि एसी लोकलच्या १० फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.