
हिंदुस्थानची शान आणि हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेळातील सर्वोच्च सन्मान देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. सरकारच्या या घोषणेने बदायूमध्ये राहणाऱ्या मेजर ध्यानचंद यांची भाची चंद्रकला भावुक झाल्या आहेत. त्यांनी मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्ताव धुडकावल्याच्या घटनेची आठवण सांगितली आहे. याबाबत ध्यानचंद यांनीच चंद्रकला यांना सांगितले होते. सर्वोच्च क्रीडा सन्मान ध्यानचंद यांच्या नावाने देण्याच्या निर्णयानंतर आपल्या मनात या आठवणी दाटून आल्याचे त्यांनी सांगितले.
बदायूच्या दातागंजच्या नौनी टिकन्ना गावात मेजर ध्यानचंद यांची भाची चंद्रकला राहतात. त्या 75 वर्षांच्या आहेत. त्या कॅप्टन रुपसिंह यांच्या कन्या आहेत. कॅप्टन रुपसिंह ध्यानचंद यांच्यासोबत हॉकी खेळत होते. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यातही ते सहभागी झाले होते. आपण 10 वर्षांचे असताना ध्यानचंद यांना टीव्हीवर हॉकी सामन्यात पाहिले होते. त्यावेळी खूप आनंद झाला होता.
ध्यानचंद घरी यायचे, तेव्हा मुलांसाठी खूप खेळणी आणि खाऊ आणायचे. ते लहान मुलांवर खूप प्रेम करायचे. कधकधी ते स्वतः बनवून मुलांना भरवायचे. ते खूप प्रेमळ स्वभावाचे होते. जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याने मेजर ध्यानचंद यांना दिलेला प्रस्ताव त्यांनी नाकारला होता. या घटनेबाबत त्यांनी आपल्याला सांगितले होते. त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा झाल्यानंतर या घटनेची प्रकर्षाने आठवण झाल्याचे चंद्रकला यांनी सांगितले.
हॉकी सामन्यात आपल्या संघाने जर्मनीच्या संघाचा पराभव केला होता. या सामन्यात ध्यानचंद यांच्या पायात फाटलेले बूट होते.ध्यानचंद यांचा अशी स्थिती बघत हिटलरने त्यांना प्रस्ताव दिला होता. तुम्ही आमच्या देशासाठी खेळलात, तर तुम्हाला चांगली नोकरी आणि खेळण्यांच्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येतील,अशी ऑफर हिटलरने मेजर ध्यानचंद यांना दिली होती. त्यावेळी देशाभिमान दाखवत मेजर ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्ताव धुडकावला होता. शेवटच्या श्वासापर्यंत आपण देशासाठी खेळणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. कोणत्याही परिस्थितीत देशाशी गद्दारी करणार नाही, असे सांगत त्यांनी हिटलरची ऑफर धुडकावली होती. ही घटना ध्यानचंद यांनीच आपल्याला सांगितली होती, असे चंद्रकला म्हणाल्या. या घटनेतून त्यांचा देशाभिमान दिसून येतो. त्यामुळे ध्यानचंद यांचे नाव येते, त्यावेळी प्रकर्षाने या घटनेची आठवण होत असल्याचे त्यांनी सांगितले.


























































