लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट; वीज पडून शेतकऱ्यांची जनावरे दगावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

शहरासह जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने झोडपले. जोरदार वारे विजांचा कडकडाट आणि अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. औसा तालुक्यात वीज पडून चार जनावरे दगावली आहेत. औसा तालुक्यातील भेटा येथील अल्पभुधारक शेतकरी गोरोबा विश्वनाथ हजारे यांच्या दोन गायी वीज पडून मरण पावल्या आहेत तर हिप्परगा (कवळी) येथील दादासाहेब साहेबराव पाटील यांची एक म्हैस मरण पावली आहे

किल्लारीपासून जवळच असलेल्या मौजे पारधेवाडी येथील शेतकरी व्यंकट बळिराम साखरे यांच्या बैलाचा वीज पडून मुत्यू झाल्याची घटना दि 4 एप्रिल रोजी पाचच्या सुमारास घडली. लातूर जिल्ह्यातील काही भागात गाराचा पाऊस झाला. लातूर शहरासह, औसा तालुका, लातूर तालुका, देवणी तालुका, शिरूर अनंतपाळ तालुका, अहमदपूर तालुका, चाकूर तालुका, निलंगा तालुका, जळकोट तालुका, रेणापूर तालुका, उदगीर तालुक्यातील काही भागात वादळी वारे , वीजांचा कडकडाट व अवकाळी पाऊस झाला. वीज पुरवठा बंद झाला होता.