नांदेडमध्ये पावसाची दमदार हजेरी

143

सामना प्रतिनिधी, नांदेड

गेली दिड महिने दडी मारून बसलेला व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करून सोडलेला पाऊस अखेर काल रात्री व आज सकाळी नांदेड शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. तरीही या पावसाने दुबार पेरणीचे संकट आजही शेतकऱ्यांवर कायम आहे.

तब्बल दीड महिने गायब झालेला नांदेड जिल्ह्याचा पाऊस अखेर आज सकाळी व काल रात्री काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपात कोसळला. आषाढी महिन्यातील संकष्टचतुर्थीच्या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने गणपती बाप्पा नांदेडकरांना पावला अशाच भावना शहरातील नागरिकांच्या होत्या. काल रात्रीपासूनच वातावरणात बदल होवून हवामान खात्याचा अंदाज पहिल्यांदा नांदेडात खरा ठरला. नांदेड शहर व परिसरात मध्यरात्री काहीवेळ आणि आज पहाटे सात ते दहा वाजेपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गेली दोन महिने उकाडा सहन करणाऱ्या नांदेडकरांना चांगलाच दिलासा मिळाला. मात्र जुलै महिन्यापर्यंत वेळ मिळून सुद्धा शहरातील नालेसफाईचे काम योग्यरित्या न झाल्याने शहरातील नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले होते. तीनच महिन्यापूर्वी शहरात पंधरा कोटी रुपये खर्च करून डांबरीकरणाचे कामे झाली, मात्र एकही गल्ली अशी राहिली नाही ज्या ठिकाणी या रस्त्यावर खड्डे नाहीत, त्यामुळे मनपाचेही पितळ उघडे पडले.

वीज वितरण कंपनीचे केबल तसेच अन्य कंपन्यांचे केबलचे काम सुरु असल्याने शहरातील ३० टक्के भागात केबलवाल्यांनी खड्डे खोदून ठेवले मात्र दिड महिना झाला हे काम पूर्ण न झाल्याने आज नांदेडकरांना चांगलीच कसरत करावी लागली. आनंदनगर, वसंतनगर, वर्कशॉप कॉर्नर, मोर चौक, पावडेवाडी नाका, मयूर विहार कॉलनी, देगलूर नाका, शिवाजीनगर, श्रीनगर, छत्रपती चौक आदी भागात वीज वितरण कंपनीच्या केबलच्या गुत्तेदाराचे प्रताप उघड्यावर पडले. मनपा म्हणते आमची जबाबदारी नाही आणि वीज वितरण कंपनीने खड्डे खोदताना आम्ही अगोदरच पैसे भरले आहेत, ती जबाबदारी महापालिकेची आहे, असे म्हणून अंग झटकले आहे. त्यात नांदेडकर मात्र भरडून निघाले आहेत.

काल रात्री एकच्या नंतर कंधार तालुक्यात देखील धुवांधार पाऊस झाला. रात्रभर पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या भागातील पेरणी उशिरा झाल्याने याठिकाणी पिकांना जीवदान मिळाले आहे. पेरणी झाल्यानंतर या तालुक्यात पाऊस गायब झाला होता. मात्र कालच्या पावसाने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. मुक्रमाबाद, कुंडलवाडी, किनवट, उमरी, मुदखेड, अर्धापूर, या भागात देखील काल रात्री पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. आज दुपारी बारा वाजता पावसाने उघडीप दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या