विष्णूपुरी प्रकल्प आटला; नांदेड शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

प्रचंड उन्हामुळे विष्णूपुरी प्रकल्पात पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून नांदेड शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल घेऊन पाण्याचा गैरवपार करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा महानगर पालिकेने दिल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपायुक्त विलास भोसीकर यांनी सामनाशी बोलताना दिली.

विष्णूपुरी प्रकल्पात आजमितीला 2.5 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असून, प्रचंड उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात होत असलेला गैरवापर, पाण्याची नासाडी यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेची चार पथके सध्या कार्यरत असल्याचे भोसीकर यांनी सांगितले. शहरातील सर्वच भागात यापुढे पाणीसाठा पूर्ण उपलब्ध होईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची बांधकामे रोखण्यात येणार असून, कोणीही घराचे, इमारतीचे बांधकाम या परिस्थितीत करु नये, वेगवेगळ्या झोनच्या माध्यमातून यावर फिरती पथके तैनात करण्यात येणार असून, हे बांधकाम न थांबविल्यास त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.