
29 महापालिका निवडणुकाRचा प्रचार आता खऱया अर्थाने सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणात कोण कोण आहे, हे चित्र स्पष्ट झाल्याने आता प्रचारात रंगत भरायला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणूक प्रचारात मकर संक्रांतीची छाप पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या प्रचार साहित्यावर मकर संक्रांतीची छाप पडल्याचे दिसत आहे. मकर संक्रांतीनिमित्त महिलांकडून वाटल्या जाणाऱ्या ‘वाणा’वरही निवडणुकीचा प्रचार रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, प्रचारात महिलांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
यंदाची निवडणूक ऐन थंडीत आल्याने प्रचारासाठी कार्यकर्त्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे, याचीही काळजी उमेदवारांकडून घेण्यात आली आहे. पारंपरिक रुमाल, दुपट्टे आणि टोप्यांसह तरुणांसाठी हुडी, महिलांसाठी साडय़ा, टिकल्या, मंगळसूत्र, हळदी-कुंकवांचे करंडे अशी विविध प्रचार सामग्री बाजारात उपलब्ध झाली आहे. नागपुरात थंडीत प्रचार करणे आव्हानात्मक ठरत असताना नेत्यांचे फोटो असलेली हुडी आणि साडय़ा प्रचारात आकर्षण ठरत आहेत. कडाक्याच्या थंडीत कार्यकर्ते घराबाहेर पडण्यास कचरतात, त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारावर परिणाम होत असल्याने बऱयाच उमेदवारांनी कार्यकर्त्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सोय केली आहे. उमेदवारांनी आणि पक्षनेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रकारच्या हुडी खरेदी केल्या आहेत. या हुडी घालून कार्यकर्ते थंडीपासून संरक्षण करत प्रचारात जोमाने सहभागी होत आहेत. महिला कार्यकर्त्यांसाठी विविध पक्षांची चिन्हे असलेल्या साडय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या साडय़ांना प्रचारात मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थंडीच्या पार्श्वभूमीवरही प्रचारात नव्या प्रकारचे साहित्य केंद्रस्थानी आले.
प्रचार साहित्यांच्या किमती महागल्या
वॉर्डातील मतदारांची भेट घेताना उमेदवार आपल्या नावाचे कॅलेंडर, बिल्ले, पॅम्प्लेट तसेच, इतर प्रचार साहित्य वितरित करतात, परंतु यंदा प्रचार साहित्याची सामग्री महागली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचार साहित्याच्या किमतींमध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रचार साहित्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरी त्याचा खरेदीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. महाग असूनही मागणीमध्ये वाढ दिसत आहे.





























































