महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा; नाना पटोले यांचे पंतप्रधानांना पत्र

महाराष्ट्रात येणाऱ्या विमानांमध्ये मराठी भाषेतून उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरातील कोटय़वधी मराठीजनांच्या भावना गौरवान्वित झाल्या. मराठी भाषेच्या समृद्ध, ऐतिहासक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचा सन्मान करणारा तो निर्णय होता. या निर्णयानंतर सरकारी कामकाज आणि यंत्रणांमध्येही मराठी भाषेचा सन्मान व्हायला हवा. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेतून उद्घोषणा करावी, असे नाना पटोले यांनी पत्रात नमूद केले आहे.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात तिचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूरसह इतर शहरांत येणाऱ्या विमानांमध्ये मराठीतून उद्घोषणा करण्यात यावी. यामुळे मराठी भाषेच्या संवर्धन व प्रसाराला चालना मिळेल तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना मराठी संस्कृती व भाषेची ओळख होईल, असेही पटोले यांनी म्हटले आहे.