रंगदेवतेची अथांग सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिद्द, मेहनत आणि अभ्यासाच्या बळावर रंगभूमीची अथांग सेवा करणारे ज्येष्ठ रंगभूषाकार दीपक लाडेकर

शाळेत असल्यापासूनच म्हणजे वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षी हौशी रंगभूमीवर रंगभूषाकार म्हणून मी काम करायचो. तेव्हापासूनच चित्रकलेची फार आवड होती. त्यामुळे मला शाळेतले शिक्षक स्नेहसंमेलनात भाग घेतलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींचा मेकअप करायला सांगायचे. तेव्हा मी काजळाने काढलेल्या दाढी-मिश्या आजही आठवतात.

त्यावेळी माझ्या शिक्षकांनी एका छोटय़ा नाटकासाठी मला रंगभूषा करायची आहे असे सांगितले. तेव्हा एका कलाकाराला टक्कल लावायचे होते, पण मला मात्र ते रंगभूषाकार राजाभाऊ गंद्रे यांनी शिकवूनही जमत नव्हते. तसे मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला प्रत्यक्ष बनियन टक्कलच्या आकारात कापणे, तिला रंग लावणे या गोष्टी मनापासून शिकवल्या. त्यानंतर ‘गुंडय़ाच्या मुंजीचा फोटो’ हे शाळेत असताना केलेले अवघे सतरा मिनिटांचे नाटक. तेव्हा आमच्या शाळेत सुप्रसिद्ध अभिनेते मोहन गोखले आणि बाळ कर्वे आले होते. त्यांनी माझ्या रंगभूषेचे कौतुक केले.

राजाभाऊ गद्रे, अशोक पांगम, बाबा वर्दम, नाना जोगळेकर, प्रशांत टिपणीस, गोपाळ नाईक, कृष्णा बोरकर, विवेक नायक, आनंद परमार यांच्या मालिका, नाटक, सिनेमा त्याचबरोबर विविध नृत्यप्रकारांसाठी कराव्या लागणाऱया रंगभूषा करू लागलो. कला सरगम या नाटय़संस्थेच्या वतीने होणाऱया मराठी आणि राज्य नाटय़ स्पर्धेसाठी तसेच मित्र सहयोग संस्थेच्या वतीने होणाऱया ऐतिहासिक, सामाजिक आणि संगीत अशा वेगवेगळ्या विषयांवरील अनेक नाटकांकरिता रंगभूषा करण्याची संधी मिळाली आहे. कोणत्याही व्यक्तिरेखेचा अभ्यास आधी करायला हवा. सगळ्या प्रकारचे फाऊंडेशन तयार मिळतात. पूर्वी आम्ही पावडरचे फाऊंडेशन तयार करायचो आणि ते आधी स्वतःच्या त्वचेला लावून बघायचो. नंतर कलाकाराला लावायचो. व्हॅसलिन, विविध तेलं, ब्लंडर ब्रॅण्डचे रंग हे सगळं आता दिसत नाही. हल्ली क्रायलॉन, डर्मा इत्यादी कंपनीचे मेकअपचे रंग वापरले जातात. तेव्हा आम्ही काजळही घरी बनवलेलेच वापरायचो.

गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात रंगभूषाकार म्हणून कार्यरत आहे. दिल्लीच्या एका संस्थेकडून ‘रंगभूमीची अथांग सेवा’ केल्याबद्दल पुरस्कार देऊन मला गौरवले. आजच्या काळात ही कला आत्मसात करणे सोपे आहे. आपण साकारलेली व्यक्तिरेखा लोकांना पटली पाहिजे. आपल्या हातांनी घडवलेली वस्तू कलाकारासाठी वापरतो. त्यातून जो आनंद मिळतो तो रेडिमेड वस्तू वापरून मिळत नाही असे मला वाटते. तरीही नवीन मुलांना जिद्द बाळगा आणि नवीन गोष्टीचा अभ्यास, सराव करून ही कला जोपासा, असे मी सांगेन.