
मुंबई शहर भागातील मंत्रालय, चर्चगेट, सीएसएमटी, गिरगाव, चंदनवाडी आदी परिसरात रोजचा पाणीपुरवठा करणाऱया फिरोजशहा मेहता उद्यान, मलबार हिल येथील 140 वर्षे जुन्या जलाशयाचे आयुर्मान संपल्याने पालिका हा जलाशय नव्याने बांधणार आहे. या कामासाठी पालिका 698 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
मुंबईत दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱया जलाशयांना अनेक वर्षं झाले आहेत. त्यामुळे अशा जुन्या जलाशयांची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. मलबार हिल जलाशय हे फिरोजशहा मेहता उद्यान येथे असून त्याची साठवण क्षमता 147.78 दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र 140 वर्षे झाल्याने आता या जलशयाची पुनर्बांधणी होणे आवश्यक असल्याने पालिकेने या जलाशयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी टेंडर मागवले असता तीन कंत्राटदारांनी त्यात सहभाग घेतला. मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्टस या कंत्राटदाराने पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा 48.88 टक्के जादा दरात काम करण्याची तयारी दर्शवली. त्या तुलनेत इतर कंत्राटदारांनी अनुक्रमे 56 टक्के व 64.74 टक्के जास्त दर भरले होते. त्या तुलनेत कमी दरात म्हणजे मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्टस या कंत्राटदाराला हे काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एकूण 698 कोटी 95 लाख रुपयांत व पुढील 8 वर्षांत सदर जलाशयाचे काम करण्यात येणार आहे.
असे होणार काम
z जलाशयाची पुनर्बांधणी करण्याच्या कामासाठी मे. स्कायवे इन्फ्राप्रोजेक्टस या कंत्राटदार कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. संबंधित कंत्राटदाराने यापूर्वी कल्याण येथे टर्न की आधारावर सर्व सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, डिझाईन, बांधकाम, उभारणी, चाचणी, विविध मलनिस्सारण पंपिंग स्टेशनचे काम केले आहे. z तर कुळगाव-बदलापूर येथे भूमिगत मलनिस्सारण रचना विकसित करण्याचे 135 कोटींचे काम केल्याचा या कंत्राटदाराचा अनुभव आहे. या जलाशयाचे काम करताना विभागातील पाणीपुरवठय़ावर परिणाम होऊ नये यासाठी बाजूलाच 23 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलाशय व 14 दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे.





























































