
मुंबईत अतिवृष्टीत कोसळणारी झाडे वाचवण्यासाठी महापालिका अमेरिकन तंत्रज्ञानावर सर्वेक्षण-तपासणी करून उपाययोजना करणार आहे. यासाठी पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून मलबार हिल, पेडर रोड भागातील झाडांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याचा अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.
अर्बोरिस्ट तंत्रज्ञानाने होणार संगोपन, संवर्धन
झाडांच्या संगोपनासाठी अमेरिकेत अर्बोरिस्ट अभ्यासक्रम शिकवला जातो. पर्यावरणाची आवड असणारे जगभरातील अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन झाडांच्या जतन-संवर्धनाची विद्या घेतली जाते. यानुसार झाडांची मजबुती, आरोग्य यांत्रिक आणि अभ्यासपूर्णरीतीने तपासले जाते. यानुसार पालिकेने ‘डी’ विभागात काम सुरू केले आहे. हे काम करण्यासाठी पालिकेने उद्यानतज्ञ वैभव राजे यांची नियुक्तीही केली आहे.
दुर्घटना टळणार, झाडे वाचवणार; असे आहे तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानानत सुईप्रमाणे धारदार वस्तू झाडात खुपसली जाते. झाडामधील चक्राकार पापुद्रय़ांची तपासणी करून झाडांची नेमकी स्थिती समजते. आधी साध्या नजरेने आणि नंतर यांत्रिक पद्धतीने झाडांची तपासणी केली जाणार आहे.

























































