
नागपूरची मराठमोळी बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिची आगामी उबेर कपसाठी हिंदुस्थानी संघात पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. यामुळे तिला सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू या दोन दिग्गज महिला बॅडमिंटनपटूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून गुरुवारी थॉमस, उबेर, डेन्मार्क ओपन व मास्टर्स स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघांची निवड करण्यात आली.
वाढदिवसाच्या पाच दिवस आधी मिळाले गिफ्ट
पाच दिवसांनंतर मालविका बनसोड 19 वर्षांची होणार आहे. वाढदिवसाआधीच हिंदुस्थानी संघात निवड झाल्यामुळे मला गिफ्ट मिळाल्याची भावना यावेळी मालविका बनसोडकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उबेर कपमध्ये देशासाठी खेळता येणार आहे याचा मला अभिमान आहे, असेही ती यावेळी म्हणाली.
फिटनेस अन् ट्रेनिंगकडे लक्ष
उबेर व थॉमस कप डेन्मार्क येथे 3 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. तसेच डेन्मार्क ओपन ही स्पर्धा 13 ते 18 ऑक्टोबरमध्ये पार पडेल. डेन्मार्क मास्टर्स ही स्पर्धा 20 ते 25 ऑक्टोबरमध्ये रंगेल. या स्पर्धांसाठी राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पण कडक नियम व क्वारंटाइन कालावधी या बाबींमुळे हे शिबीर घेता येणार नाही. त्यामुळे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून हे शिबीर रद्द करण्यात आले. तसेच थेट संघांची निवडही करण्यात आली. मात्र निवडलेल्या खेळाडूंना फिटनेस व ट्रेनिंगबाबतचा अहवाल बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाला यावेळी द्यावा लागणार आहे.
– थॉमस कपसाठी हिंदुस्थानचा चमू
किदाम्बी श्रीकांत, पारूपल्ली कश्यप, लक्ष्य सेन, शुभंकर डे, सीरील वर्मा, मनू अत्री, बी. सुमीत रेड्डी, एम. आर. अर्जुन, ध्रुव कपिला, कृष्णप्रसाद गरग.
– उबेर कपसाठी हिंदुस्थानचा चमू
पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आकर्षी कश्यप, मालविका बनसोड, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी, पूजा दंडू, संजना संतोष, पूर्वीशा राम, जक्कामपुडी मेघना.
– डेन्मार्क ओपन व मास्टर्ससाठी हिंदुस्थानचा चमू
किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी.



























































