मलबार हिल, पेडर रोडमधील सोसायट्या पालिकेच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीच कॅण्डी अशा उच्चभ्रू भागातील सोसायटय़ांमध्ये वाढणारा कोरोना रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांत 48 अधिकारी-कर्मचाऱयांच्या टीमने रुग्ण आढळलेल्या 60 सोसायटय़ांमध्ये धडक देऊन स्क्रिनिंग, तपासणी केली आहे. सोसायटय़ांमध्ये नियमितपणे स्क्रिनिंग, सॅनिटायझेशन करून त्याचे रेकॉर्ड ठेवावे असे निर्देश देण्यात आले आहे. पालिका आठवडय़ातून दोन वेळा या रेकॉर्डची तपासणी करणार असून हलगर्जीपणा आढळल्यास ‘साथरोग नियंत्रण कायद्या’नुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये काम करणाऱया ड्रायव्हर, हाऊसकिपिंग कामगार, सिक्युरिटी गार्ड यांची संख्या 170 आहे. त्यामुळे 184 इमारती आणि इमारतींचे भाग सील करण्यात आले आहेत. तर 10 कंटेनमेंट झोन आहेत. या भागात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

रुग्णसंख्या आटोक्यात येतेय
n ग्रॅण्ट रोड परिसरात दररोज सरासरी 30 ते 35 रुग्णांपर्यंत खाली असलेला आकडा गेल्या आठवडय़ात सरासरी 50 वर पोहोचला होता. मात्र पालिकेच्या माध्यमातून केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे ही संख्या गेल्या दोन दिवसांतच 35 ते 40 पर्यंत खाली आल्याचे ‘डी’ वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड सांगितले.

n सर्व्हंट टॉयलेटचे दिवसातून चार वेळा निर्जंतुकीकरण, परिसराचे निर्जंतुकीकरण, घरोघरी जाऊन केलेली तपासणी यामुळेचे हे यश येत असल्याचे ते म्हणाले. सध्या सील असलेल्या 184 इमारती-इमारतींच्या भागांपैकी दोन दिवसांत सुमारे 40 भाग खुले होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विभागातील 10 कंटेनमेंट झोनमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण एक ते दोन असल्याची माहितीही त्यांनी दिली.