
- मलिका अमरशेख
आपण ऐकत नाही, बदलत नाही. मग निसर्गच यावर उपाय शोधतो. कोरोना निर्माण होतो. माणसं नष्ट होतात. पण बाकीच्यांना काळजी घेण्याची गरज उत्पन्न होते. ओझोनचं भोक बुजलं जातं – प्रदूषण कमी होतं – समुद्रांतर्गत प्रदूषण – अणुस्फोटांच्या चाचण्या – हे कारण आणि त्सुनामी परिणाम दर्शवणारंच आहे.
ग्रहांचा ग्रहांवर परिणाम होतो… मोसमांचा पृथ्वीवर परिणाम होतो… माणसांचा माणसांवर परिणाम होतो… फक्त ग्रह, मोसम हे निसर्गनियमानुसार चालतात… आपलं तसं नाही. परिणाम इष्ट वा अनिष्ट कसाही झाला तरी आपण माणसं नियम बदलून परिणाम पुसून पुनश्च कोरी पाटी होऊ शकतो. अगदी राजकारणापासून ते देव-धर्म-जात-श्रद्धा-मूल्य बदलेपर्यंत! अर्थात कारण!! कारण महत्त्वाचं… काही वेळेला तर कारण नसताना पण बदल घडून येतात. इतक्या लांबवर चंद्र आहे, पण त्याच्या बदलत्या कलांचा परिणाम समुद्र भरती-ओहोटीवर होतो…
आपण ठरलो माणूस. चंद्र बदलो आपली कक्षा वा सूर्यावर सौरवादळ येवो – आपण निसर्गाची अपत्य असलो तरी आपल्यावर नैसर्गिक कारणांचा ढिम्म परिणाम होत नाही. त्सुनामी येवो अगर प्रदूषण – जंगल कापणं अगर ओझोनला भोक पडो, आम्ही तरी पण कार्बन उत्सर्जन करीत राहू… उंच उंच 100/200 मजली इमारती उभ्या करू. त्यासाठी जंगल तोडू… झाडं कापू… वाळू चोरू… प्लॅस्टिकचे नवे प्रकार शोधून मग त्यावर बंदी घालण्याचं नाटकपण करू!
कारण आणि परिणाम यावर चर्चा करण्याचं काम तर शास्त्रज्ञ – पर्यावरणवादी – आणि शेवटी सरकारचं असतं… आपण काही त्यात मोडत नाही. तसं पण आजकाल शास्त्रज्ञ फक्त नासातच सापडत असावेत. संत प्रेषितांनी तर जन्म घेण्याचंच बंद केलंय… रॉय-टिळक-आगरकर-फुले-आंबेडकरांनंतर समाजसुधारक न् लोकांना दिशादर्शक असे नेते तर शोधून सापडणार नाहीत.
म्हणजेच आम्ही इतके सुधारलो आहोत की, आता संत, प्रेषित, सुधारकांची गरज राहिली नाही की काय, असे म्हणावंसं वाटतं. तर सुधारणा, प्रगती, विकास यांच्या कितव्यातरी मजल्यावर आपण पोचलोय.
अमेरिकेत – चंद्रावर काय चाललंय ते आम्हाला घरात बसून कळतं. फक्त एकमेकांसोबत राहात असलेल्या माणसांची मनं कळत नाहीत. करायचंय काय कळून? शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतंय हे माहीत नसतं तर गगनचुंबी इमारतीच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टय़ांचं काय माहीत असणार? त्यात खूपसे गरीब लोक राहतात. कारण ते पहिल्यापासूनच गरीब न् रस्त्यावर राहतात. या कारणामुळे शहरात खूप गर्दी झालीय. खरं तर जमिनीवरच का जमिनीखाली पण घरं बांधायला हवीत. समुद्र तर खूपच आहेत आणि खूपच लांबलचक… छोटय़ा छोटय़ा पाणबुडय़ांची घरं केली तर खूपच गर्दी कमी होईल. मोठमोठे पूल बांधायचा त्रास पण वाचेल.
कारण आधी जन्माला येतं नंतर परिणाम. लोक पटापट लग्न करतात. त्यामुळे मूल जन्माला आल्यावर त्याला शाळेची ऍडमिशन, कॉलेजची फी अशा अनेक परिणामांची रांगच सुरू होते.
हल्ली लोक युद्धखोर झालेत. परिणाम भयंकर तरीही युद्धं परवडली नाहीत तरी खुमखुमी असतेच. तर असे जे युद्धखोर लोक वा नेते आहेत हेच कारण आहे. तर ते कारण नष्ट करायचं म्हंजे, कारण तर खूप वेगवेगळय़ा धर्मात जीवजंतू मारणं मनला असतं. त्या त्या नेत्यांना ती दीक्षा देऊन टाकली की युद्ध करण्याची भाषाच करणार नाहीत कुणी! आता कुणी असं पण म्हणेल, ‘असं कसं जबरदस्तीनं कोण दीक्षा घेईल?’ तर असं खूपदा झालंय. आता पहा राजकारणात एका विचाराचा पाठीराखा असलेला पटकन दुसऱया पक्षाशी विचारांची दीक्षा घेऊन मोकळा होतो. सांगते ना – कारण असलं की परिणाम घडतोच.
पृथ्वीवर खूप खूप प्रॉब्लेम आहेत. पण सर्वांवर उपाय आहेत. पण कुणालाच ते प्रॉब्लेम सोडूसे वाटत नाही. त्यांना वाटतं ‘मला तर खूप कामं आहेत. दुसरं कुणीतरी सोडवेल प्रॉब्लेम’! असं प्रत्येकजण विचार करतो त्यामुळे अर्थातच प्रश्न जैसे थे तैसेच!
आपण ऐकत नाही, बदलत नाही. मग निसर्गच यावर उपाय शोधतो. कोरोना निर्माण होतो. माणसं नष्ट होतात. पण बाकीच्यांना काळजी घेण्याची गरज उत्पन्न होते. ओझोनचं भोक बुजलं जातं – प्रदूषण कमी होतं – समुद्रांतर्गत प्रदूषण – अणुस्फोटांच्या चाचण्या – हे कारण – परिणाम त्सुनामी!
विकासाच्या तकलादू उंच झाडावर आपण उभं आहोत की ज्याची पायाची मूळ भुसभुशीत झालीत… उखडू लागलेत. आपण माकड होतो तेव्हा कुठल्या तरी एकाच जातीशी इमान राखून होतो. माणूस होता होता आपण रात्र झालोय. आणि सकाळ होता होता आपण एकमेकांना खाऊन संपवलं नाही तर बघू सकाळ… ज्यात नवी सकारात्मक कारण आणि ऊर्जादायी जीवनदायी परिणाम असतील!!




























































