भिंतीनं कान टवकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मलिका अमरशेख.

घर… आपल्या बऱयावाईट घटनांचं साक्षीदार. निशब्द राहून घडणाऱया आनंदाच्या, दु:खाच्या क्षणांना टिपून घेत राहतं. काळाच्या अल्याड-पल्याडची सारी गुंतागुंत केवळ घराच्या सान्निध्यातच उलगडली जाते. ही गुंतागुंतच भिंत-छत-पडदे-सोफा-भिंतीवरल्या फोटोतली माणसं अशा घरपणाला आयाम देऊ लागते.

‘‘कुलूप उघडलं जातय् – मालक आला वाट्टं’’

पडदा सळसळत कुजबुजला

‘‘रहात तं नाही इथं उगाच सामान आणून ठेवतो.’’

‘‘शः शः’’

दरवाजा उघडला गेला… घरमालकामागोमाग चार-पाचजण एक टेबल घेऊन आले… हॉलमध्ये टेबल ठेवलं गेलं. पाठोपाठ खुर्च्या पण आल्या… मालकानं सांगितल्या ठिकाणी टेबल ठेवलं गेलं. त्यानं समाधानानं मान डोलावली. सगळय़ा घरावरून नजर फिरवली न् तो पुन्हा मागं वळून त्या चार-पाच जणांना बाहेर घेऊन गेला. दरवाजा ओढून कुलूप लावल्याचा आवाज आला.

भिंत-छत-पंखा-पडदे-सोफा-जाजम-भिंतीवरल्या फोटोतली माणसं न् फोटोतला कुत्रा… झालंच तर निसर्ग पेंटिंग्जमधला ससा हरणं हंस त्यांनी पण मान वेळावून सर्वांनी टेबल खुर्च्यांना पाहून घेतलं.

देखणं मजबूत शिसवी लाकडावरलं कोरीव काम. जाड काचेवर फुलं पान वेलबुट्टी-खुर्च्या आढय़तेनं ताठ बसलेल्या –

‘‘या घरात तुमचं स्वागत आहे.’’

भिंतीनं मोठेपणा दाखवत त्यांना सांगितलं.

पडद्यानं सळसळत हुंकार दिला.

मऊ गाद्या अंगावर असलेला सोफा खुर्च्यांकडे कटाक्ष टाकत बोलला…

‘‘फारच कडक टणक अंग आहे. जेवताना कसं आरामशीर बैठक हवी… माझ्यासारखी’’

एक खुर्ची गर्रकन् वळली – फणकाऱयानं बोलती झाली.

‘‘अस्सल साग आहे बरं का मी… जातीवंत सागवान.

वाळवीची भीती नाही का पाण्याची. नुस्तं अंगावर मऊ कापड असलं तरी काय उपयोग? एखाद्या नाठाळ पोरानं ब्लेड  किंवा धारदार काही फिरवलं की फाटलच – ’’

सोफा रागानं आणखी लालभडक झाला.

पंख्यानं हसून घेतलं.

‘‘अरे, या घरात आयुष्य जायचय्. नवीन आहेत ते. आल्या आल्या काय भांडता न् उणीदुणी काढता माणसांसारखी.’’

भिंतीवरल्या कपाटानं दार उघडून जांभई दिली. कंटाळलेपणे डोळे फिरवत म्हणाला,

‘‘हळू हळू भांडणाचा उत्साहपण ओसरेल… कुणीच येणार नाही. उठबस करत गप्पा मारत क्वचित आरडाओरडा – पोरांचा दंगा नाही काही नाही. की प्रेमानं हळूवारपणे धूळ स्वच्छ करून साफ करणारा हात नाही. पहा नं माझ्या अंगावर किती धूळ जमलीय.’’

कपाटातल्या डोळय़ातल्या धूळभरल्या टप् टप् पाण्यानं आतमधले शो पीस भिजू लागले… न् सगळय़ांचा एकच गलका झाला…

आता पहिल्यांदाच टेबलानं आवाज चढवला..

‘‘काय गोंधळ आहे. दुकानात होतो तेच बरं वाटू लागलंय. वाटलं कुठल्या तरी चांगल्या घरात पडू पण कसलं काय – म्युझियममध्ये ऍण्टिकपीस म्हणून लोक पहायला तरी येतात. इथं मूळ लोकांनाच कुणी विचारत नाहीयत्… तर ठीक आहे. यावर पण उपाय आहे.’’

चारी भिंतीनं पडद्यानं सोफ्यानं कपाटानं एकाचवेळी ‘का।़य?’ म्हटलं…

‘‘आपणच एकमेकांना स्वच्छ करू. एकमेकांशी गप्पा मारू. एकमेकांची विचारपूस करू. तुम्ही सर्वजण आपापली मूळ ओळख द्या बरं – ’’

‘‘आम्ही चारी भिंती सख्ख्या भावाप्रमाणे बरोबर असतो नेहमी. आम्हाला आडनाव नाही, पण मूळ वास्तुपुरुषाच्या कुळाप्रमाणे आमचं मूळ खानदान – रेती – सिमेंट – खडी – विटा…’’

‘‘म्हंजे थोडक्यात माती म्हण ना… पण माझ्याइतकं अस्सल नाही.’’ जमीन ठसक्यात म्हणाली. अंगावरला किमती गालिचा  उडवत तिनं आपलं पांढरशुभ्र संगमरवरी अंग दाखवलं.

‘‘आमच्यात इतकी सरमिसळ केलीय ना की आमचं मूळ रूप आठवतच नाही.’’ दुसऱया भिंतीनं टिप्पणी केली.

पडद्यानं सळसळत लहरत हसत म्हटलं – ‘‘अरे पण त्यामुळेच तर तुम्ही मजबूत कणखर झालात ना.’’

सोफ्यानं उदासपणे मान हलवली – ‘‘छेः छेः या माणसांना कशात तरी काहीतरी मिसळल्याशिवाय रहावतच नाही. सगळय़ात भेसळ करतात.’’

दुसरी खुर्ची तावातावानं पुढं आली, ‘‘तर काय स्वतः तर माणसासारखे वागत तर नाहीच आणि आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करतात. पाण्यापासनं वीज काय करतात – लाकडापासनं घरं, कागद… आमच्यासारखं आयुष्य तर भयानक. आम्हाला मिळवण्यासाठी काय भयानक डावपेच खेळतात.’’

‘‘गंमत म्हंजे हे लोक आपल्याला बनवतात न् विकत घेतात; पण माणसांना त्यांच्यासारख्या माणसांना पण ‘बनवतात न् विकतपण घेतात. खूनपण करतात. एकमेकांना ठार मारतात, पण खातही नाहीत.’’ 3री खुर्ची फणफणली, चौथीनं मग तोंड उघडले.

‘‘कित्ती मूर्ख… बाई बाई – भूक लागली की गवत खायचं. बकऱया – कोंबडय़ा खायच्या – जर एकमेकांना खायचं नाही तर मारायचं कशाला?’’

निसर्गचित्रातल्या सिंहानं डरकाळी फोडली –

‘‘आम्ही त्यांना मारून त्यांची जात कमी करू शकतो. त्यांनी इतकं जंगलाचं नुकसान केलंय की त्या मानवांना या पृथ्वीवर रहाण्याचा काही अधिकार नाही.’’

कपाटावरलं कॅलेंडर जोरात फडफडलं त्यावरच्या वाघानं पंजा जोरात आपटला –

‘‘आमची जात मारून मारून कमी केली या मानवानं – आम्ही खाऊन कधी साठवून ठेवत नाही. हे कागदाचे कपटे साठवून ठेवतात. अक्कलशून्य लेकाचे. तुम्ही पाहिले कधी वाघाने सिंहिणीला डोळा मारला किंवा हत्तीनं हरणीवर बलात्कार केला?’’

सगळय़ांनी ‘नाही नाही’चा ओरडा केला. सिंहानं मोठी गर्जना केली.

‘‘पण यांना कुणीही यांच्यातल्या माद्या चालतात. मग लहान वेगळी असं काही नाही.’’

– एक तटस्थ शांतता पसरली.

पडदा मंद सळसळला…

‘‘पण पहा – आत्ता हा जो बदल या लोकांनी आपल्यात केला त्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय नाही. आपल्याला त्यांच्यावरच अवलंबून रहावं लागेल. खुर्ची परत लाकूड होऊन जंगलात नाही जाऊ शकत, भिंत परत माती होऊ शकत नाही. आता आपली जागा घरात आहे यातच रहाणं एकमेकांसोबत हे मान्य करावं लागेल.’’ टेबलाच्या काचेच्या पारदर्शक चेहऱयावर नापसंती आली.

‘‘जर यांना आम्हाला घेऊन बंद घरातच ठेवायचं होतं तर दुकानात काय वाईट होतो आम्ही? दुसऱयाचं न् जगाचे नुकसान करण्यात फक्त पटाईत आहेत हे लोक.’’

‘म्हणजे दुसऱया कशात तरी आमचं रूपांतर करायचं आणि मग एकतर आमचा दुरुपयोग करायचा किंवा वापर करायचाच नाही.’’ खुर्ची तिरस्कारानं तणतणली.

‘‘यांच्या जगातल्या माद्या कनिष्ठ मानतात हे. आपण त्याहून खाली – म्हणून आपले हे हाल.’’

‘‘कनिष्ठपणाची यांची व्याख्या तरी कायाय?’’

‘‘त्यांच्या सोयीनुसार असते, म्हंजे ज्यांच्यावर अन्याय केला तरी ते सहन करतात ते कनिष्ठ.’’ सिंह गुरगुरतच म्हणाला.

‘‘आपणा सर्वांचं घर जंगल – पाऊस आला तरच आपण गुहेत आसरा घेतो… किंवा कोणी घरटय़ात बिळात – पण हे तर स्वतः घर तर बांधतातच; पण कागदाच्या नोटांनाही बंद कपाटात ठेवतात – एवढंच काय अन्नपण थंड कपाटात ठेवतात. आता आपल्याला पण बंद घरात ठेवून गेलेत.’’

– अचानक कसलासा आवाज झाला. सगळीकडे शांतता पसरली… पुन्हा कुलूप उघडलं गेलं – दरवाजा उघडला गेला. एक मंद सुगंधाची झुळूक आली. पडदे सळसळत हसले… दारात आलेल्या रंगीबेरंगी पातळाच्या पदरानं आनंदात लहरत टाळीसाठी हात पुढं केला, पण दारापासून खिडकीचा पडदा खूपच लांब होता…

‘‘अय्या।़… कित्ती सुंदर टेबल खुर्ची आणलीय… आणि सोफापण कित्ती सुंदर कलर माझ्या लिपस्टिकसारखा… वॉव।़…

ग्रेट सरप्राईज गिफ्ट -’’

‘‘ममा ।़ ।़ लुक लायन – ’’

‘‘फॅन चालू करते… बाई बाई एवढय़ात धूळपण साचली.’’

‘‘मॉम ।़ भूक लागली आधी मी पिझ्झा ऑर्डर करतो पण रात्री मस्त जेवण कर घरीच. नव्या घरी नवं जेवण – ’’

‘‘नाही आधी मी घर स्वच्छ करणार – झाडू कुठाय् ।़’’

पडदे-सोफा-भिंती-फोटो-टेबल खुर्च्या-पंखा… सगळे  समाधानानं हसले… वाट पहात बंद रहाणं कित्ती बोअरिंग असतं… सगळं घर मंद प्रसन्न हसलं!

 malikaamarshaikh1234

@gmail.com