मलकापूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; सांगली-पेठ रस्त्यावर तीन वाहनांचा भीषण अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समोरील कारने अचानक ब्रेक लावल्याने कार थांबण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठीमागून डंपरने कारला जोराची धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सांगली-पेठ रस्त्यावरील पडळवाडी शिवारात शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. यात सात वर्षांची एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. अपघातातील मृत सर्वजण कराड तालुक्यातील आगाशिवनगर, मलकापूर येथील आहेत. नातेवाईकांकडे वास्तुशांती समारंभासाठी ते निघाले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

अधिकराव जगन्नाथ पोळ (वय 49), गीताबाई जगन्नाथ पोळ (वय 70), सुषमा अधिकराव पोळ (वय 42), सरिता सुभाष पोळ (वय 35) अशी मृतांची नावे आहेत, तर समृद्धी सुभाष पोळ (वय 7, सर्व रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) ही गंभीर जखमी झाली आहे.

आगाशिवनगर येथील पोळ कुटुंबीय नातेवाईकाच्या घरांच्या वास्तुशांती समारंभासाठी आज सकाळी कारमधून सांगलीकडे निघाले होते. यावेळी अधिकराव पोळ यांच्यासह त्यांची पत्नी, आई, पुतणी व भाऊजी असे पाचजण कारमध्ये होते. पेठ नाका ते ईश्वरपूरमार्गे सांगलीकडे जात असताना पडवळवाडीनजीक समोरच्या कारचालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे पोळ यांनीही त्वरित ब्रेक दाबून आपली कार थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात चौघे जागीच ठार झाले, तर एक चिमुकली गंभीर जखमी झाली. जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरमधील अधिकराव पोळ यांचे इतर नातेवाईक, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपचार सुरू असणाऱया रुग्णालयांमध्येही नातेवाईकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती. या घटनेमुळे आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.