
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी डॉ. मनमोहन सिंह फेलोशिप प्रोग्रामच्या उद्घाटन समारंभात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. खरगे यांनी म्हटले आहे की, डॉ. मनमोहन सिंह हे कमी बोलून जास्त काम करणारे नेते होते, तर आजचे पंतप्रधान बोलण्यातच जास्त वेळ घालवतात आणि काम कमी करतात. त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले.
मोदी सरकारवर टीका करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, “आजचे पंतप्रधान आणि त्यांचे सरकार हे कामापेक्षा प्रचारावर जास्त भर देतात. आम्ही सर्वांनी पाहिले आहे की, डॉ. मनमोहन सिंह कमी बोलायचे आणि जास्त काम करायचे, पण आजच्या पंतप्रधानांचे नेमके उलट आहे. ते बोलण्यातच जास्त व्यस्त असतात.” त्यांनी सरकारच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, आज देशातील लोकांना खोट्या आश्वासनांनी फसवले जात आहे.