
‘‘काँग्रेसची ताकद कमी झाली असली, सत्ता नसली तरी काँग्रेसच्या पाठीचा कणा ताठ आहे. संविधान, धर्मनिरपेक्षता आणि गरीबांच्या अधिकारांच्या मुद्दय़ावर आम्ही कुठलीही तडजोड केलेली नाही. सत्ता नाही म्हणून आम्ही सौदा करणार नाही,’’ असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ठणकावले. काँग्रेसच्या 140व्या स्थापनादिनी पक्षाच्या या मुख्यालयात संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेस संपली म्हणणाऱयांना खरगे यांनी खडे बोल सुनावले. ‘‘काँग्रेस हा विचार आहे आणि विचार कधी मरत नाही,’’ असे ते म्हणाले. ‘‘काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाने मते मागितली नाहीत. मंदिर आणि मशिदीच्या नावाने द्वेष पसरवला नाही. काँग्रेस जोडणारा पक्ष आहे, तर भाजप तोडणारा पक्ष आहे. काँग्रेसने धर्माकडे एक श्रद्धेची, आस्थेची बाब म्हणून पाहिले आहे. मात्र काही लोकांनी धर्माला राजकीय स्वरूप दिले,’’ अशी टीका त्यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
भाजपकडे सत्ता, सत्य नाही!
‘‘आज भाजपकडे सत्ता असली तरी त्यांच्याकडे सत्य नाही. त्यामुळेच त्यांना कधी आकडेवारी लपवावी लागते, कधी जनगणना थांबवावी लागते, कधी ते राज्यघटना बदलण्याची चर्चा घडवून आणतात. जे आज इतिहासावर भाषणे देत आहेत, त्यांचे पूर्वज इतिहास घडत असताना पळून गेले होते,’’ असा हल्ला खरगे यांनी चढवला.




























































