मुरबाडमधील सुस्त आरोग्य यंत्रणेची झाडाझडती

372

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुरबाड तालुक्यात 184 आदिवासी बालकांना कुपोषणाचा फास बसल्याच्या दैनिक ‘सामना’च्या वृत्ताची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने मुरबाड तालुक्याचा दौरा करून येथील सुस्त आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली. कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात सीटीसी यंत्रणा बसविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येतील, तसा अहवाल मुख्यमंत्र्यांना लागलीच देण्यात येईल, असे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

मुरबाड तालुक्यात धसई, किशोर, म्हसा, सरळगाव, शिवळे, शिरोशी, मोरोशी आणि तुळई या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तब्बल 184 बालके कुपोषणाचा सामना करत असून त्यातील 29 अतिकुपोषित आणि 155 कुपोषित असल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मधून आकडेवारीसह प्रसिद्ध करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना मुरबाड तालुक्यातील आरोग्य केंद्र आणि तेथील कुपोषित बालकांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले.

किशोर, म्हसा, मुरबाड, धसई या आरोग्य केंद्रांना डॉ. सावंत यांनी भेटी दिल्या. या तिन्ही आरोग्य केंद्रांमध्ये सीटीसी सेंटर उभारण्याची गरज डॉ. सावंत यांनी व्यक्त केली. या सीटीसी केंद्रात बालकांसाठी दुग्धपानाची तसेच आहाराची व्यवस्था करून त्यांचे वजन वाढते की नाही याची नोंदणी केली जाते. डॉ. सावंत आरोग्यमंत्री असताना त्यांनी पालघर जिह्यात असे सीटीसी केंद्र उभारून आदिवासी बालकांच्या कुपोषणावर मात करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. बालविकास केंद्रांमार्फत या बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याची योजना तातडीने अमलात आणली जाईल असे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये एसएनसीयू युनीट उभारण्यासाठीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचेही सांगितले.

  •  म्हसा आरोग्य केंद्रात पाहणी केली असता बालकांच्या जन्म-मृत्यूची नोंद योग्य प्रकारे ठेवली जात नसल्याची गंभीर बाब   दिसताच डॉ. सावंत यांनी संबंधित अधिकाऱयांना फैलावर घेतले.
  •  हायवेवर असलेल्या गोवेली येथे ट्रॉमा केअर सेंटर तातडीने उभारण्याची गरज असून त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
  •  ग्रामीण रुग्णालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून त्याची तातडीने सुधारणा व्हावी.कुपोषित बालकांच्या शुशुषेसाठी डॉक्टरांसह सर्व सुविधा मिळाव्यात, असा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.
आपली प्रतिक्रिया द्या